‘स्वाधार’ला ६० कोटींचा निधी मिळाला, लवकरच विद्यार्थ्यांच्या खात्यात जमा होणार
By गणेश वासनिक | Published: May 14, 2023 12:52 AM2023-05-14T00:52:48+5:302023-05-14T00:53:01+5:30
लवकरच विद्यार्थ्यांच्या खात्यात जमा होणार, स्वाधार योजनेमध्ये अधिक सुलभता येणार
गणेश वासनिक, अमरावती: समाज कल्याण विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेसाठी तब्बल ६० कोटींचा निधी शनिवारी मिळाला आहे. त्यामुळे गत काही महिन्यांपासून निधीच्या प्रतीक्षेत असलेल्या विद्यार्थ्याना मोठा दिलासा मानला जात आहे. विद्यार्थ्यांच्या हक्काचा निधी लवकरच त्याच्या खात्यात जमा केला जाणार आहे.
स्वाधार योजनेच्या अटी व नियमांमध्ये बदल होऊन सुधारणा होण्यासाठी विविध विद्यार्थी संघटना व सामाजिक संघटना यांच्याकडून सातत्याने मागणी करण्यात येत आहे. त्या अनुषंगाने समाज कल्याण आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे यांच्या आदेशानुसार समिती गठित करण्यात आली होती. राज्यातील विविध विद्यार्थी संघटना यांच्या मागणीच्या अनुषंगाने त्यांच्या समवेत चर्चा व बैठक करून याबाबत प्रस्ताव तयार करण्यात आला. स्वाधार योजनेच्या अटी, शर्ती व त्या अनुषंगाने काही बदल येणाऱ्या काळात होणार आहेत. त्यामुळे स्वाधार योजनेच्या अंमलबजावणीमध्ये सुलभता निर्माण होणार आहे. विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ अधिक गतिमान पद्धतीने व वेळेत देणे सोयीचे होणार आहे.
समाज कल्याणचे ४४१ वसतिगृह, ५० हजार विद्यार्थी
राज्यात समाज कल्याण विभागाचे ४४१ शासकीय वसतिगृह आहेत. यात ५० हजार विद्यार्थींची शिक्षणाची सोय आहे. मात्र ज्या विद्यार्थ्यांना शासकीय वसतिगृहात प्रवेश मिळालेला नाही, अशा विद्यार्थ्यांसाठी स्वाधार योजना सुरू केली आहे. दरवर्षी सुमारे २५ हजार विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळते. राज्यात विभागीय, जिल्हा व तालुका याप्रमाणे विविध स्तरावर विद्यार्थ्यांना ६० हजार ते ४८ हजार वार्षिक त्यांच्या खात्यात जमा केले जातात. यापूर्वी स्वाधार योजनेसाठी १५ कोटींचा निधी मिळाला होता. १२ मे २०२३ रोजी ६० कोटींचा निधी ऑनलाईन प्रणालीवर आयुक्तालयास उपलब्ध झाला आहे.
समाज कल्याण विभागाची भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना महत्त्वपूर्ण व यशस्वी योजना आहे. विद्यार्थ्यांना शिक्षण घेताना कोणतीही अडचण होऊ नये म्हणून पाठपुरावा करून निधी प्राप्त करून घेण्यात आला आहे. येणाऱ्या काळात योजना राबविताना अधिक सुलभता व पारदर्शकता निर्माण होणार आहे. विद्यार्थ्यांनी अभ्यासाकडे लक्ष द्यावे. कोणाच्याही अपप्रचाराला बळी पडू नये. -डॉ. प्रशांत नारनवरे आयुक्त ,समाज कल्याण