वरुडात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा आक्रोश मेळावा
By admin | Published: November 15, 2016 12:10 AM2016-11-15T00:10:33+5:302016-11-15T00:10:33+5:30
शेतकऱ्यांसाठी लढा देणाऱ्या युवा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे विदर्भाध्यक्ष देवेंद्र भुयार यांच्यावर ...
देवेंद्र भुयारच्या तडीपारीचा निषेध : शेतकऱ्यांची लक्षणीय उपस्थिती
वरुड : शेतकऱ्यांसाठी लढा देणाऱ्या युवा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे विदर्भाध्यक्ष देवेंद्र भुयार यांच्यावर शेतकरी आंदोलनादरम्यान गुन्हे दाखल करून प्रशासनाने दोन वर्षांकरिता तडीपार केले. शासनाचा हाच न्याय असेल तर सरळ दाउद इब्राहीमला देशाचा प्रधानमंत्री तर अरुण गवळीला महाराष्ट्राचा मुख्यमंत्री करा, असा सल्ला प्रशासनाला स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक खा. राजू शेट्टी यांनी रविवारी बेनोडा येथे आयोजित आक्रोश मेळाव्यात केले.
देवेंद्र भुयार यांनी शेतकऱ्यांच्या दु:खावर फुंकर घालण्याकरिता आंदोलने केली. हा त्यांचा गुन्हा आहे काय? युवा नेतृत्व संपविण्याचा हा राजकीय प्रयत्न असल्याचा आरोपही खा. शेट्टी यांनी केला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उद्योजक गुणवंत देवपारे, प्रमुख मार्गदर्शक म्हणून राज्य वस्त्रोउद्योग महामंडळाचे अध्यक्ष रविकांत तुपकर, निर्मला भुयार, महादेवराव भुयार ,प्रदेशाध्यक्ष प्रकाश पोकळे, प्रदेश प्रवक्ता गजानन अमदाबादकर, जिल्हाप्रमुख अमित अढावू, युवा स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष आशिष वानखडे, उमेश बंड, पुण्याचे बापूसाहेब करंडे, बुलढाण्याचे जिल्हाप्रमुख श्याम अवथळे, श्रीहरी सावरकर, मंगेश ठाकरे यांच्यासह आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी वस्त्रोउद्योग महामंडळाचे अध्यक्ष रविकांत तुपकर यांनीसुध्दा शासनावर आणि पोलिसांवर चांगलीच तोफ डागली. आक्रोश मेळाव्याला परिसरातून शेकडो शेतकरी, शेतमजूर तसेच युवकांची उपस्थिती होती. बेनोडा येथील जिल्हा परिषद शाळेच्या प्रांगणात हा कार्यक्रम पार पडला. मेळाव्याकरिता उपजिल्हाप्रमुख मंगेश ठाकरे, तालुकाप्रमुख शैलेश ढोबळे, सुमित गुर्जर, उमेश डबरासे, ऋषिकेश राउत, प्रवीण देशमुख, विवेक आलोडे आदींनी प्रयत्न केले.
यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी दिलीप गवई, वरुडचे ठाणेदार गोरख दिवे, शेंदूरजनाघाटचे एस.एन नितनवरे तसेच बेनोडा (शहीद) चे ठाणेदार शांतीकुमार पाटील यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. (तालुका प्रतिनिधी)