मिठाई चविष्ट, दर्जेदार किती ?
By admin | Published: September 29, 2016 12:08 AM2016-09-29T00:08:53+5:302016-09-29T00:08:53+5:30
अळीयुक्त कचोरी विकणाऱ्या 'रघुवीर'ची मिठाई चविष्ठ वाटत असली तरी ती दर्जेदार किती...
पारदर्शकता काय? : विश्वास एकतर्फीच !
अमरावती : अळीयुक्त कचोरी विकणाऱ्या 'रघुवीर'ची मिठाई चविष्ठ वाटत असली तरी ती दर्जेदार किती या महत्त्वपूर्ण प्रश्नाच्या मुळाशी जाताना अनेक धक्कादायक तत्थ्ये समोर येतात.
'रघुवीर'चा नाश्ता दर्जेदार असल्याचे अमरावतीकर मानत आले होते. तथापि दर्जा किती राखला जातो, हे 'लोकमत'ने केलेल्या पाठपुराव्याच्या अनुषंगाने उघड झाले आहे. नजरेआड केवळ पैसा कमविण्याचा व्यापार येथेही चालतो.
जसे कचोरी, समोसा, सांबारवडी, पालकवडा आणि पेटीस याबाबत घडते तसेच मिठाईबाबतही घडते. रघुवीरची मिठाई उत्तमच, असा ज्यांचा विचार असेल त्यांनी त्यांचा विचार पुन्हा तपासून बघायला हवा.
मिठाई निर्मितीत पारदर्शकता किती, हा मोठाच प्रश्न उपस्थित होतो. मिठाईतून तुमच्या पोटात नेमके काय चालले याचे छातीठोक उत्तर कुणीही देऊ शकत नाही. मिठाईचे इन्ग्रेडियन्ट काय, याची जराही माहिती सामान्य ग्राहकांना दिली जात नाही. व्यापार होतो तो केवळ विश्वासाच्याच भरवशावर. मिठाई खरेदी करताना विश्वास ठेवून तुम्हाला मिठाई दिली जात नाही. त्यासाठी रघुवीरने ठरविलेले पैसे अदा करावेच लागतात. परंतु तुम्हाला मात्र 'काय खातो?' हे विचारण्याची मुभा नाही. विश्वास ठेवूनच मिठाई सेवन करावी लागते. विश्वास हा व्यापार एकतर्फी आहे. चिल्ल्या-पिल्ल्यांच्या पोटातही जाणारी ही मिठाई निकोप असेल याची शाश्वती कोण देणार?
रघुवीरचा नाश्ता न खाण्याचा भावी अधिकाऱ्यांचा संकल्प
उपजिल्हाधिकारी, उपविभागीय पोलीस अधिकारी, तहसीलदार, पोलीस निरीक्षक, अन्न सुरक्षा अधिकारी यासारखे अधिकारी ज्या स्पर्धा परीक्षेतून तयार होतात, त्या राज्य सेवा आयोगाच्या परीक्षांची तयारी कणाऱ्या ८० सुविद्य विद्यार्थ्यांनी आता रघुवीरचा नाश्ता, मिठाई न खाण्याचा तसेच पार्सल न बोलविण्याचा संकल्प सोडला. तसा ठरावच त्यांनी घेतला. त्यांच्या या निर्णयाचे समर्थन करताना ते सांगतात, आम्ही उद्याचे अधिकारी आहोत. लोक भ्रष्टाचाराने वैतागले आहेत. नियम पाळलेच जावेत, यासाठी आम्ही आजच सतर्क असायलाच हवे. 'लोकमत'मुळे जनजागृतीला सुुरुवात झाली. सामन्यांच्या आरोग्याशी खेळ करणारे असे काही प्रकार यापूर्वीही उघडकीस आले आहेत. 'रघुवीर'च्या नाश्त्यात फकडी आणि झुरळ हे किटक आढल्याचे अनुभव आमच्यातील काहींचे आहेत. असा प्रकार घडल्यावर नाश्ता परत करून, राग व्यक्त करून विषयाला विराम दिला जातो. तथापि सामान्यांनी त्यांचे अधिकार वापरून प्रत्येकवेळी अशा मुद्यांची रीतसर तक्रार एफडीएला आणि पोलिसांना करायला हवी. पंचनामा करवून घ्यायला हवा. असे होत नाही. एफडीए अधिकाऱ्यांसमोर काजुच्या प्लेट पेश केल्या जातात. म्हणूनच अधिकारी कारवाई करीत नाहीत. रघुवीरसारख्यांचा धंदा त्यामुळेच फोफावतो. ग्राहक हक्काचे संरक्षण व्हावे, यासाठी आता प्रत्येक ग्राहकाने पुढे सरसावायला हवे. स्वत:ची लढाई स्वत: लढायला हवी. त्याचाच आरंभ म्हणून हा आमचा सामूहिक संकल्प आहे. प्रत्येक सदस्याने किमान दहा लोकांना जागे करण्याची शपथ आम्ही घेतली आहे. आम्ही ८० जण ८०० लोकांना जागे करू. 'खाणार नाही तर विकणार कसे?' हा आमचा मुलमंत्र असल्याचे या युवाशक्तीने स्पष्ट केले. 'अॅम्बिशन अॅकॅडमी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्रा'च्यावतीने वैभव मस्के आणि इतरांनी त्यांची ही भूमिका 'लोकमत'ला कळविली. लोकमतच्या अभिनंदनाचा ठरावही या भावी अधिकाऱ्यांनी घेतला.