गोड वाणीने होतात व्यक्तिमत्त्वातही बदल!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2019 10:36 PM2019-01-16T22:36:47+5:302019-01-16T22:37:03+5:30
कुणी हिमालयाच्या उंचीचे कार्य केले असेल; परंतु ते आपुलकीने, संवेदनशीलपणे इतरांपर्यंत पोहचविता येणारी वाणी नसेल, तर ते कार्य सामाजिक अर्थाने अपूर्णच राहील. उत्तुंग कार्यासोबतच गोड वाणी आणि क्षमाशीलतेचा गुण अंगी बाळगता आला, तर त्या उत्तुंगतेला सुगंधाचा दरवळ हमखास जाणवेल, अशा शब्दांत अमृता गायगोले यांनी भावना व्यक्त केल्या. 'लोकमत'च्या 'गोड बोला, गुड बोला' या उपक्रमाच्या अनुषंगाने त्यांनी हे अभ्यासू पैलू वाचकांसाठी उलगडले.
अमरावती : कुणी हिमालयाच्या उंचीचे कार्य केले असेल; परंतु ते आपुलकीने, संवेदनशीलपणे इतरांपर्यंत पोहचविता येणारी वाणी नसेल, तर ते कार्य सामाजिक अर्थाने अपूर्णच राहील. उत्तुंग कार्यासोबतच गोड वाणी आणि क्षमाशीलतेचा गुण अंगी बाळगता आला, तर त्या उत्तुंगतेला सुगंधाचा दरवळ हमखास जाणवेल, अशा शब्दांत अमृता गायगोले यांनी भावना व्यक्त केल्या. 'लोकमत'च्या 'गोड बोला, गुड बोला' या उपक्रमाच्या अनुषंगाने त्यांनी हे अभ्यासू पैलू वाचकांसाठी उलगडले.
कंटाळवाण्या आणि अल्पपयोगी शिक्षणातून विद्यार्थीप्रिय आणि आयुष्योपयोगी शिक्षणाचा प्रयोग अमरावतीत 'शाश्वत कन्सेप्ट स्कूल'च्या माध्यमातून रूजविणाऱ्या अमृता अतुल गायगोले यांच्या कार्याची दखल आता देशभरात घेतली जाऊ लागली आहे. त्या सांगतात, ज्यावेळी कुणी 'गोड बोलतात, गुड बोलतात' त्यावेळी त्यांच्या मेंदूतील विचारप्रकियादेखील त्याच दिशेने कार्यरत होते. बोलणे ही मनोशारीरिक क्रिया असल्यामुळे सातत्याने संवेदनशील भाषेचा वापर केल्यास अवघे व्यक्तिमत्त्वच तसा आकार घेऊ लागते. हा अफलातून लाभ केवळ विचारपूर्वक बोलण्यामुळे प्राप्त होऊ शकतो.
विद्यार्थ्यांनी बोलण्यापूर्वी विचार करण्याची सवय लावल्यास, ते जे बोलतील ते उपयोगी आणि प्रभावी असेल. ते लाभकारकच असेल. विचारांशिवाय व्यक्त केलेले बोल समस्या निर्माण करू शकतात. तमाम विद्यार्थ्यांनी हे समीकरण पक्के लक्षात घ्यावे, त्याचा आवर्जून अंमल करावा, असे आवाहन अमृता यांनी केले.