स्वीटमार्टच्या माध्यमातून शहरात गोड विषाची विक्री
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2018 01:18 AM2018-06-29T01:18:10+5:302018-06-29T01:19:15+5:30
खव्याच्या कमतरतेची पूर्तता करण्याकरिता त्याऐवजी रेडिमेड ‘कुंदा’ वापरून गोड मिठाई तयार केली जाते. हा कुंदा शरीराला घातक असून, ते प्रचंड भेसळयुक्त असल्याने आरोग्यास धोकादायक आहे. त्यामुळे शहरात स्वीटमार्टच्या माध्यमातून खुलेआम ‘गोड विषाची’ विक्री केली जात आहे व याकडे अन्न व औषध प्रशासनाने हेतुपुरस्सर दुर्लक्ष केले जात आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
चांदूरबाजार : खव्याच्या कमतरतेची पूर्तता करण्याकरिता त्याऐवजी रेडिमेड ‘कुंदा’ वापरून गोड मिठाई तयार केली जाते. हा कुंदा शरीराला घातक असून, ते प्रचंड भेसळयुक्त असल्याने आरोग्यास धोकादायक आहे. त्यामुळे शहरात स्वीटमार्टच्या माध्यमातून खुलेआम ‘गोड विषाची’ विक्री केली जात आहे व याकडे अन्न व औषध प्रशासनाने हेतुपुरस्सर दुर्लक्ष केले जात आहे.
मांगलिक प्रसंगांमुळे खव्याचा मागणीत प्रचंड वाढ झाल्याचे दिसून येते. मात्र, दुधाचे भाव व तयार करण्याचा खर्च पाहता शुद्ध खव्यााचे पदार्थ तयार करून विक्री करणे न परवडणारे आहे. याला पर्याय म्हणून पेढा तयार करण्याकरिता १३० ते १५० रुपये प्रती किलो दराचा तयार कुंदा वापरण्याचा सोपा मार्ग उपहारगृह व स्वीटमार्ट यांनी स्वीकारला आहे.
कुंदापासून तयार केलेल्या गोड पदार्थांमध्ये मात्र दुप्पटीपेक्षा जास्त नफा मिळतो. त्यामुळेच व्यावसायिक ते पदार्थामध्ये मोठ्या प्रमाणात भेसळयुक्त कुंद्याचा वापर करतात. या भेसळयुक्त कुंद्यात खव्याचे प्रमाण अत्यल्प असून तांदुळाचे पीठ व डालड्याचा वापर केला जात असल्याची माहिती एका व्यावसायिकांने नाव न छापण्याच्या अटीवर दिली.
खव्याच्या नावावर हा कुंदा तालुक्यात खरपी, खामला (मध्यप्रदेश) तसेच काही व्यावासिकयांना भंडारा-गोंदिया भागातून कुंदा येत असल्याची माहिती आहे, तर जिल्ह्यात बुलडाणा जिल्ह्यातील नांदुरा येथून खव्याच्या नावावर कुंदा शहरात दाखल होतो. १५० रुपये किलोने खरेदी केलेला भेसळयुक्त कुंद्यापासून तयार झालेली मिठाई ४०० ते ६०० रुपये प्रति किलोने सर्रास विक्री केली जात आहे. मात्र सर्वसामान्यांच्या आरोग्यास धोकादायक असलेल्या कुंद्याचा वापराकडे अन्न व औषध प्रशासन हेतुपुरस्सर डोळेझाक करीत आहे.