मिठाईच्या दराचे स्टिकर, ‘एक्सपायरी डेट’ का नाही?

By admin | Published: September 21, 2016 12:10 AM2016-09-21T00:10:03+5:302016-09-21T00:10:03+5:30

‘रघुवीर’प्रतिष्ठानातील कचोरीत अळी आढळल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाल्यानंतर आता दुग्धजन्य पदार्थांबाबतही संशय निर्माण झाला आहे.

Sweets discounted sticker, why not expiry date? | मिठाईच्या दराचे स्टिकर, ‘एक्सपायरी डेट’ का नाही?

मिठाईच्या दराचे स्टिकर, ‘एक्सपायरी डेट’ का नाही?

Next

एफडीएची भूमिका संदिग्ध ? : अनेक नियमांचे उल्लंघन, तरीही दुर्लक्ष
अमरावती : ‘रघुवीर’प्रतिष्ठानातील कचोरीत अळी आढळल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाल्यानंतर आता दुग्धजन्य पदार्थांबाबतही संशय निर्माण झाला आहे. दुग्धजन्य पदार्थांपासून तयार केलेल्या मिठाईवर दराचे ‘स्टिकर्स’ लावले जातात. मात्र ‘एक्सापायरी डेट’ व मिठाईतील घटकांची माहिती का दिली जात नाही, असा प्रश्न ग्राहकांना पडला आहे. या पदार्थांची तपासणी अन्न व औषधी प्रशासन (एफडीए) केव्हा करणार? सामान्यांच्या आरोग्याशी संबंधित या गंभीर बाबीकडे एफडीएचे सहायक आयुक्त जयंत वाणे लक्ष देणार का, असा प्रश्नही उपस्थित केला जातोय.
दुग्धजन्य पदार्थ नाशवंत असल्याने त्याचे सेवन २४ किंवा ४८ तासांत करणेच योग्य असते. जर ती मिठाई ताजी नसेल आणि थंड ठिकाणी साठविलेली नसेल तर खाणे टाळावे, अशा महत्त्वाच्या सूचना एफडीएकडून मिठाई व्यावसायिकांना दिल्या जातात.

दर तगडे, नियम धाब्यावर
अमरावती : या दुग्धजन्य मिठाईत सूक्ष्मजीव व जिवाणू वाढीस लागण्याची प्रक्रिया गतिमान असते. त्यामुळे अशी मिठाई खाणे आरोग्याला हानिकारक ठरते. रघुवीरमधील शीतकपाटात ठेवलेले पदार्थ ताजे आहेत का, ते किती दिवसाचे आहेत, याची नियमित तपासणी केली जाते की नाही, ही बाब संशय निर्माण करणारी आहे. ब्रेड, दूध, डोनट व पॅकिंग केलेल्या अन्य दुग्धजन्य पदार्थांवर उत्पादन व 'एक्सापायरी डेट' टाकणे विक्रेत्याला बंधनकारक असते. या पदार्थांमध्ये कोणते घटक आहेत, याची माहितीसुद्धा पदार्थांवर नोंदविणे अनिवार्य असते. त्याप्रमाणे या पदार्थांवर उत्पादन व एक्सापायरी डेट सुद्धा टाकली जाते. मात्र, रघुवीर प्रतिष्ठानात केवळ मिठाईच्या दराचे स्टिकर्सखेरीज अन्य कोणत्याही माहितीचे स्टिकर्स आढळून येत नाही. मिठाईचे तगडे दर आकारूनही ग्राहकांना उत्पादनबाद्दल माहिती दिली जात नाही. हा प्रकार ग्राहकांच्या हक्काला डावलणाराच आहे. अमरावतीकरांच्या भरवशावर गलेलठ्ठ झालेल्या रघुवीर प्रतिष्ठानने शहरात व शहराबाहेर प्रस्थ वाढविले आहेत. मात्र, ग्राहकांच्या आरोग्याची काळजी घेण्याकडे मात्र त्यांचे दुर्लक्ष असते. एफडीएच्या नियमावलीचे पालन त्यांच्याद्वारे पूर्णपणे केले जात नाही. मग एफडीएचे प्रभारी सहायक आयुक्त जयंत वाणे कारवाई का करीत नाहीत, हादेखील प्रश्नच आहे.

कर्मचाऱ्यांची वैद्यकीय तपासणी होते काय ?
खाद्यान्न तयार करणाऱ्या व ग्राहकांना खाद्यान्न पुरविणारे कर्मचारी निरोगी असणे आवश्यक आहे. त्यांची वैद्यकीय तपासणी करणेही गरजेचे आहे. एखादा कर्मचारी आजारी असेल तर, त्यापासून संसर्ग ग्राहकांपर्यंत पोहोचण्याची दाट शक्यता असते. मात्र, रघुवीरमधील कर्मचाऱ्यांची नियमित वैद्यकीय तपासणी केली जाते का? तेथील कर्मचारी निरोगी आहेत का, याबद्दल एफडीएने कधी चौकशी केली आहे काय, असा सवाल आता जागरूक नागरिक उपस्थित करीत आहेत.

दुग्धजन्य पदार्थ तयार करताना योग्य ती काळजी घेणे आवश्यक असते. तेथील कारागिरांची वैद्यकीय तपासणी होणेही आवश्यक असते. ते पदार्थ योग्य त्या तापमानात ठेवणे ही बाबही महत्त्वाची आहे. या सर्व बाबींकडे लक्ष न दिल्यास इन्फेक्शन होऊ शकते. या पदार्थांपासून विषबाधा झाल्यास उलटी, अतिसार, ताप व अन्य आजार हाऊ शकतात
- स्वप्निल सोनोने,
जनरल फिजिशियन, अमरावती

Web Title: Sweets discounted sticker, why not expiry date?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.