सीसीटीव्हीने गवसला वृद्धाला लुटणारा ठकबाज; राजापेठ पोलिसांचे यश
By प्रदीप भाकरे | Published: April 9, 2023 02:57 PM2023-04-09T14:57:31+5:302023-04-09T14:59:27+5:30
अडीच महिन्यानंतर उकल
प्रदीप भाकरे, अमरावती : एका ८२ वर्षीय वृद्धाच्या हातावर शस्त्राने घाव घालून त्यांच्या घरातून ११०० रुपये हिसकावून पळणाऱ्या आरोपीला जेरबंद करण्यात राजापेठ पोलिसांना रविवारी यश आले. विवेक विनायक राऊत (४८ वर्ष, रा. आष्टा, ता. धामणगाव रेल्वे) असे अटक आरोपीचे नाव आहे. केवळ सीसीटीव्ही फुटेजमुळे अडीच महिन्यानंतर या घटनेची उकल होऊ शकली.
गणेश कॉलनी येथील विजय श्यामसुंदर देवगावकर हे पत्नीसह घरी असताना २८ जानेवारी रोजी रात्री ९ च्या सुमारास एक अज्ञात आरोपी तोंडाला दुपट्टा बांधून, चष्मा घालून त्यांच्या घरात शिरला. त्याने विजय देवगावकर यांना तीन लाख रुपये मागितले. त्यांनी नकार दिला तेव्हा त्याने देवगावकर यांच्या डाव्या हातावर शस्त्राने वार करून त्यांना जखमी केले तथा तो जबरीने ११०० रुपये घेऊन तेथून पळून गेला. राजापेठ पोलिसांनी ३० जानेवारी रोजी अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल केला. घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारावर परिसरात खबऱ्यांना सक्रिय केले. त्यावेळी काही संशयितसुद्धा पडताळण्यात आले. परंतु, गुन्ह्याचा कुठलाही सुगावा लागला नाही.
दरम्यान, रविवारी गोपनीय माहितीच्या आधारे शिताफीने सापळा रचून विवेक विनायक राऊत याला ताब्यात घेण्यात आले. त्याने गुन्ह्याची कबुली दिली आहे.
यांनी केली कारवाई
पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी, पोलीस उपायुक्त विक्रम साळी व सहायक पोलीस आयुक्त भारत गायकवाड व पूनम पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली राजापेठचे ठाणेदार मनीष ठाकरे, पोलीस उपनिरीक्षक गजानन काठेवाडे, छोटेलाल यादव, सागर सरदार, नीलेश गुल्हाने, दिनेश भिसे, विकास गुळधे, नरेश मोहरील यांनी ही कारवाई केली. कुठलाच सुगावा नसताना केवळ पाठपुराव्याच्या बळावर राजापेठ पोलिसांना ही यशस्विता मिळाली.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"