‘स्वाईन फ्लू’ बाधितांची धाव अकोला, नागपूरकडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2017 12:10 AM2017-07-19T00:10:12+5:302017-07-19T00:10:12+5:30
स्वाईन फ्लूची लक्षणे सर्वसाधारण आजारासारखीच असल्यामुळे निदान होत नाही आणि रूग्णाची प्रकृती अचानक खालावते.
योग्य निदान न झाल्याने धोका : स्थिती हाताबाहेर गेल्यावर ‘रेफर’
अमरावती : स्वाईन फ्लूची लक्षणे सर्वसाधारण आजारासारखीच असल्यामुळे निदान होत नाही आणि रूग्णाची प्रकृती अचानक खालावते. त्यानंतर बहुतांश स्वाईन फ्लू बाधितांना अकोला किंवा नागपूरला हलविले जाते. परिणामी वेळेत उपचार न मिळाल्याने स्वाईन फ्लू बाधित रूग्ण दगावतो. सद्यस्थितीत असाच प्रकार जिल्ह्यात पाहायला मिळत आहे. त्यामुळे स्वाईन फ्लूने दगावणाऱ्या रूग्णांची संख्या वाढते आहे.
चोरपावलांनी येणाऱ्या या भयंकर रोगाबाबत पुरेशा जनजागृतीचा अभाव व जिल्हा प्रशासन आणि आरोग्य यंत्रणेत योग्य समन्वय नसल्यामुळेच स्वाईन फ्लू बाधित रूग्णांच्या योग्य नोंदी देखील घेतल्या जात नाहीत. स्वाईन फ्लू हा आजार इतर ‘फ्लू’सारखाचा आजार आहे. सर्दी, खोकला, घसादुखी, अंगदुखी, मळमळ उलट्या होणे, अशी सर्वसाधारण लक्षणे यारोगातही आढळून येतात. याच लक्षणांच्या आधारे बहुतांश डॉक्टर औषधोपचार करतात. अशातच तीन-चार दिवस उलटून जातात.
निदानच न झाल्याने योग्य औषधोपचार होत नाही आणि रूग्णची प्रकृती खालावते. रूग्णांची अवस्था गंभीर झाल्यानंतर त्यांना श्वासोच्छवासात त्रास, तीव्र पोटदुखी जाणवू लागते. तरीदेखील बहुुतांश डॉक्टरांना स्वाईन फ्लूची लक्षणे असल्याचे लक्षात येत नाही. मग, आपसुकच औषधोपचार प्रायोगिक तत्त्वावर सुरू असतात. अशा चुकीच्या औषधोपचारांमुळे रूग्ण मृत्युपंथाला लागतो. तेव्हा कुठे डॉक्टरर्स त्यांना नागपूर किंवा अकोल्याला पुढील उपचारासाठी रेफर करतात. परंतु तोवर वेळ निघून जाते. रूग्ण औषधोपचाराला प्रतिसाद देईलच याची खात्री उरत नाही. परिणामी रूग्ण दगावतोे. अशा स्थितीत ‘स्वाईन फ्लू’सारख्या गंभीर आजारावर नियंत्रण मिळविणार तरी कसे?, हा खरा प्रश्न आहे. मुंबई, पुण्याप्रमाणेच अमरावती जिल्ह्यात देखील स्वाईन फ्लूने हातपाय पसरले आहेत. पॉझिटिव्ह रूग्ण आढळून येत आहेत. कित्येकांचा तर मृत्युदेखील झाला आहे. महापालिका क्षेत्रात आठ तर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात एकाचा ‘स्वाईन फ्लू’ने मृत्यू झाल्याची शासकीय आकडेवारी आहे. मात्र, प्रत्यक्षात ही आकडेवारी अधिक आहे.
कसा होतो प्रसार
स्वाईन फ्लूचे विषांणू संसर्ग पसरवितात, याचा प्रसार एका व्यक्तीपासून दुसऱ्याला होतो. स्वाईन फ्लूबाधित व्यक्तिच्या खोकण्यातून किंवा शिंकण्यातून उडणारे तुषार हवेच्या माध्यमातून दुसऱ्यापर्यंत पोहोचतात. ते विषाणू धुलिकरणवेष्टीत स्वरुपात जीवंत राहतात. श्वसनादरम्यान नाकातून किंवा तोंडावाटे या रोगाचा संसर्ग होऊ शकतो. अशा बाधित व्यक्तिच्या नाकावाटे किंवा तोंडावाटे बाहेर निघणारा कफ हातावर लागल्यास त्यानंतर तो व्यक्ती ज्याठिकाणी स्पर्श करेल, तेथे संसर्ग होऊ शकतो.
विषाणूंचा प्रसार थांबविण्यासाठी हे करा उपाय
तोंड आणि नाक पूर्णत:स झाकून वावरा, नाक पुसण्यासाठी टिश्यू पेपरचा वापर करा, हात वारंवार धुवावेत, टणक पुष्ठभाग असणाऱ्या वस्तू निट पुसून घ्याव्यात, उदा.दरवाजे, कड्या, रिमोट कंट्रोल.
लक्षणे
स्वाईन फ्लूूची लक्षणे ही सर्व साधारण फ्लू सारखीच असतात. थंडी वाजणे, ताप १०० अंश फॅ. पेक्षा अधिक, सर्दी, खोकला, घसादुखी, अंगदुखी, उलटी, जुलाब, मळमळ व कधी कधी पोटदुखी.