अमरकंटकहून परतलेल्या दोघींचा स्वाईन फ्लूने मृत्यू ? नागरिकांमध्ये धास्ती, आरोग्य यंत्रणा सक्रिय
By ऑनलाइन लोकमत | Published: September 29, 2017 07:53 PM2017-09-29T19:53:35+5:302017-09-29T19:53:49+5:30
अमरकंटकच्या यात्रेहून परतलेल्या बडनेºयातील दोन महिलांचा गत पंधरवड्यात ‘स्वाईन फ्लू’ने मृत्यू झाल्याने परिसरात खळबळ उडाली असून नागरिक धास्तावले आहेत. पंधरवड्यापूर्वी मरण पावलेल्या महिलेचा ‘स्वॅब’ पॉझिटिव्ह आल्याने स्वाईन फ्लूचे निदान झाले.
अमरावती - अमरकंटकच्या यात्रेहून परतलेल्या बडने-यातील दोन महिलांचा गत पंधरवड्यात ‘स्वाईन फ्लू’ने मृत्यू झाल्याने परिसरात खळबळ उडाली असून नागरिक धास्तावले आहेत. पंधरवड्यापूर्वी मरण पावलेल्या महिलेचा ‘स्वॅब’ पॉझिटिव्ह आल्याने स्वाईन फ्लूचे निदान झाले. तर शुक्रवारी २९ सप्टेंबर रोजी स्वाईन फ्लू सदृश आजाराने दुस-याही महिलेचा मृत्यू झाला. मात्र, अद्याप तिच्या ‘स्वॅब’चा अहवाल आरोग्य प्रशासनाला प्राप्त झालेला नाही. मात्र, उपरोक्त दोन्ही महिलांचा मृत्यू स्वाईन फ्लूनेच झाल्याची परिसरात चर्चा आहे.
बडनेरा जुन्या वस्तीतील कंपासपु-यातील रहिवासी जीजाबाई प्रदीप वाठ (६५) व सुशीला सदाशिव निमकर (६५) या दोन्ही महिला महिनाभरापूर्वी अमरकंटक येथे यात्रेसाठी गेल्या होत्या. त्यांच्यासोबत परिसरातील अन्य सहा महिला देखील होत्या. यात्रेहून परतल्यानंतर उपरोक्त दोघींना ताप आला. त्यानंतर हातपाय दुखणे, अंगावर सूज येणे ही लक्षणे दिसून आली. उपचारानंतरही तब्येतीत सुधारणा न झाल्याने दोघींनाही खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले. स्वाईन फ्लूची लक्षणे दिसल्याने जीजाबाई वाठ यांचे थ्रोट स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले. त्यांना स्वाईन फ्लूची लागण झाल्याची पृष्ठी आरोग्य विभागाने केली आहे. दरम्यान उपचार सुरू असताना पंधरवड्यापूर्वी जीजाबार्इंचा मृत्यू झाला.
समान लक्षणे सुशीला निमकर यांच्यामध्येही आढळल्याने त्यांच्यावर स्वाईन फ्लूचे उपचार सुरू होते. त्यांचा स्वॅब देखील तपासणीसाठी पाठविण्यात आला आहे. मात्र, त्याचा अहवाल येण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. या घटनेच्या पार्श्वभूमीवर सुशीला निमकर व जीजाबाई वाठ यांच्यासह अमरकंटक यात्रेला गेलेल्या अन्य महिलांसह त्यांच्या कुटुंबियांनाही ‘टॅमीफ्लू’चे उपचार आरोग्य विभागाने सुरू केले आहेत. अन्य प्रांतातूनच स्वाईन फ्लूची परिसरात लागण झाल्याचा कयास आरोग्य विभागाने वर्तविला आहे.
जीजाबाई वाठ यांचा स्वॅब ‘स्वाईन फ्लू’ पॉझिटिव्ह होता. तर सुशीला निमकर यांचा तपासणी अहवाल प्राप्त झालेला नाही. या गंभीर आजारावर नियंत्रण ठेवण्यासाठी यंत्रणा तैनात आहे.
- वैशाली मोटघरे,
वैद्यकीय अधिकारी, मोदी दवाखाना, बडनेरा