प्रवासातून ‘स्वाईन फ्लू’ची एन्ट्री

By admin | Published: April 5, 2017 12:02 AM2017-04-05T00:02:34+5:302017-04-05T00:02:34+5:30

हवेच्या माध्यमातून एकापासून दुसऱ्यापर्यंत झपाट्याने पसरणाऱ्या स्वाईन फ्लूने आतापर्यंत जिल्ह्यात दोघांचे बळी घेतले आहेत.

Swine Flu entry from travel | प्रवासातून ‘स्वाईन फ्लू’ची एन्ट्री

प्रवासातून ‘स्वाईन फ्लू’ची एन्ट्री

Next

आतापर्यंत दोघांचा मृत्यू : आणखी दोन पॉझिटिव्ह, १६ संशयीत
अमरावती : हवेच्या माध्यमातून एकापासून दुसऱ्यापर्यंत झपाट्याने पसरणाऱ्या स्वाईन फ्लूने आतापर्यंत जिल्ह्यात दोघांचे बळी घेतले आहेत. सद्यस्थितीत इर्विन रूग्णालयात या गंभीर आजाराचे आणखी दोन पॉझिटिव्ह रूग्ण उपचार घेत असून आतापर्यंत १६ संशयितांवर उपचार करण्यात आल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. ‘स्वाईन फ्लू’या गंभीर, प्राणघातक आजाराचा झपाट्याने प्रसार होत असताना प्रशासनाची बेपर्वाई मात्र संतापजनक आहे. रूग्णसंख्या अशीच वाढत राहिल्यास ‘महामारी’सदृश स्थिती निर्माण होण्यास वेळ लागणार नाही.
स्वाईन इन्फ्लूएन्झा किंवा स्वाईन फ्लू वराहांमध्ये आढळणाऱ्या विषाणुंमुळे होतो. वराहांच्या सतत संपर्कात आल्यास मनुष्याला या विषाणुची बाधा होऊ शकते. स्वाईन फ्लू हा संसर्गजन्य रोग असून तो एकाकडून दुसऱ्यापर्यंत हवेच्या माध्यमातून पसरतो. याविषाणुचा प्रसार रूग्णाच्या नाकातील व घशातील स्राव, त्याचा घाम वा त्याच्या थुंकीमधून होतो. आतापर्यंत स्वाईन फ्लूच्या संशयित १६ रूग्णांवर इर्विन रुग्णालयात उपचार करण्यात आले आहेत. चांदूरबाजार तालुक्यातील शिरजगाव कसबा व स्थानिक विलासनगरातील महिलेचा स्वाईन फ्लूने मृत्यू झाल्याचे ‘स्वॅप’ तपासणीच्या अहवालानंतर स्पष्ट झाले तर आणखी दोघांचे ‘स्वॅप पॉझिटिव्ह’ असल्याची माहिती पुढे आली आहे. आतापर्यंत आढळलेल्या ‘स्वाईन फ्लू’च्या रूग्णांची आरोग्य विभागामार्फत माहिती काढण्यात आली असून मनपा व इर्विन प्रशासनाने तसा अहवाल तयार केला आहे. प्रवासातून जिल्ह्यात ‘स्वाईन फ्लू’चा ्प्रसार झाल्याचे निदर्शनास आले आहे. या आजाराचे पुणे, मुंबई, नाशिक व अकोला आदी शहरात बळी गेले असून प्रवासातून ‘स्वाईन फ्लू’चा प्रसार वेगाने होत असल्याचा निष्कर्ष आहे.

जिल्ह्यावर संकट, प्रशासन मात्र सुस्त
स्वाईन फ्लूसारखा जीवघेणा आजार जिल्ह्यात पाय पसरवित असताना जिल्हा प्रशासनाला मात्र याबाबत फारसे गांभीर्य असल्याचे दिसत नाही. ‘स्वाईन फ्लू’चा प्रसार रोखण्याकरिता कोणतेच ठोस पाऊल उचलले गेले नाही. इर्विन आणि महापालिका प्रशासन एकमेकांकडे अंगुलीनिर्देश करून जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न करीत असल्याचे चित्र आहे. ग्रामीण व शहरी दोन्ही भागात स्वाईन फ्लूचे रूग्ण आढळले आहेत. त्यामुळे ‘स्वाईन फ्लू’कडे नागरिकांसह जिल्हा प्रशासनाने गांभीर्याने बघणे आता आवश्यक झाले आहे.

असा आहे ‘स्वाईन फ्लू’ रुग्णांचा प्रवास
शहरातील खापर्डे बगिचा परिसरातील एक ५० वर्षीय महिला १८ ते २७ मार्च दरम्यान द्वारकाधीश येथे ओखापुरी एक्सप्रेसने तीर्थयात्रेसाठी गेली होती. तेथून येताच त्यांची प्रकृती बिघडली आणि त्यांच्यावर ‘स्वाईन फ्लू’ प्रतिबंधात्मक उपचार सुरु करण्यात आले. त्यांच्यासोबतच्या ६ महिलांची तपासणी देखील जिल्हा सामान्य रूग्णालयात करण्यात आली आहे. गगलानी नगरातील ५१ वर्षीय व्यक्ती ६ मार्च रोजी जबलपूर येथे आठवड्याकरिता गेले होते. त्यांचीही प्रकृती अचानक बिघडली. त्यांच्यासह पाच जणांवर अकोला येथील रुग्णालयात उपचार करण्यात आले. गगलानीनगरातीलच एक ४० वर्षीय व्यक्ती शिरजगाव पोलीस विभागात कार्यरत होते. कार्यालयीन कामकाजानिमित्त ते २१ जानेवारी ते ८ मार्चपर्यंत चिखलदरा येथे दहा दिवस गेले होते. त्यांचीही प्रकृती अचानक बिघडली. शहरातील विविध रुग्णालयात उपचार घेतल्यानंतर त्यांचा नागपूरच्या रुग्णालयात मृत्यू झाला. त्यांच्या संपर्कातील पाच जणांवर उपचार करण्यात आलेत. तसेच विलासनगरातील एका महिला जानेवारीत पुणे येथे गेली होती. तेथून परतताच त्यांची प्रकृती बिघडली आणि त्यांचा ३० मार्च रोजी मृत्यू झाला. त्यांच्या संपर्कातील सात जणांवर अद्यापही उपचार सुरु आहेत.

‘स्वाईन फ्लू’च्या उपचारासाठी सर्व सुविधा उपलब्ध आहेत. यासंदर्भात नुकतीच बैठक सुद्धा झाली आहे. आम्ही ‘स्वाईन फ्लू’बाधित रूग्णांवर लक्ष ठेऊन आहोत. उपाययोजना व जनजागृती सुरु केली आहे.
-अरूण राऊत,
जिल्हा शल्य चिकित्सक, इर्विन

Web Title: Swine Flu entry from travel

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.