स्वाईन फ्लू : आकडेवारीत लपवाछपवी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2017 12:01 AM2017-07-18T00:01:36+5:302017-07-18T00:01:36+5:30
राज्यभर स्वाईन फ्लू या संसर्गजन्य आजाराने थैमान घातले असताना जिल्हा परिषदेच्या आरोग्य प्रशासनाने दिलेली आकडेवारी संशयास्पद असल्याची भीती व्यक्त होत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : राज्यभर स्वाईन फ्लू या संसर्गजन्य आजाराने थैमान घातले असताना जिल्हा परिषदेच्या आरोग्य प्रशासनाने दिलेली आकडेवारी संशयास्पद असल्याची भीती व्यक्त होत आहे.
जिल्ह्याची लोकसंख्या २८ लाखांच्या घरात असताना आतापर्यंत स्वाईन फ्लूचे केवळ दहा बळी दर्शविले जात असले तरी ही संख्या कितपत विश्वासार्ह आहे, हा प्रश्नच आहे.एकीकडे महापालिकेच्या आरोग्य विभागाकडे स्वाईन फ्लूचे आतापर्यंतचे बळी, पॉझिटिव्ह रूग्णांची संख्या आणि स्वॅबचा अहवाल उपलब्ध असताना जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाकडे मात्र, या परिपूर्ण माहितीची वानवा आहे. जिल्हा आरोग्य अधिकारी नितीन भालेराव यांच्यानुसार, जिल्ह्याच्या ग्रामीण भागात स्वाईन फ्लूमुळे एकाच व्यक्तिचा बळी गेला आहे. शहर तथा जिल्ह्यातील ग्रामीण भागात स्वाईन फ्लूचा कहर सुरू असताना आणि शहरात या भयंकर आजाराने आठ बळी गेले असताना भालेराव यांनी दिलेली आकडेवारी संभ्रम निर्माण करणारी आहे. राज्यात मागीलवर्षीप्रमाणे यंदाही जुलै-आॅगस्ट महिन्यात स्वाईन फ्लूचा संसर्ग वाढण्याची भीती आरोग्य खात्याने वर्तविली आहे. या आजारामुळे आजमितीला राज्यात २९६ जणांचा मृत्यू झाला असून अडीच हजारांपेक्षा अधिक नागरिकांना स्वाईन फ्लूची लागण झाली आहे. एकीकडे राज्यभर या आजाराचे थैमान सुरू असताना अमरावती जिल्हा परिषदेचा आरोग्य विभाग मात्र या रोगाबाबत, आणि बाधितांची संख्या तसेच याआजारामुळे मरण पावलेल्या रूग्णांच्या संख्येबाबत अनभिज्ञ आहे. झेडपीच्या आरोग्य विभागाकडे उपलब्ध माहिती परिपूर्ण नसून मनपा आणि जिल्हा परिषदेने दिलेल्या आकडेवारीत मोठी तफावत आढळली आहे. राज्याचे आरोग्यमंत्री दीपक सावंत ‘स्वाईन फ्लू‘च्या प्ररासाबाबत कमालीचे सजग असताना जिल्हा आरोग्य अधिकारी भालेराव यांची ही प्रशासकीय अनास्था संतापजनक आहे.
जिल्ह्याच्या चौदा तालुक्यातील आरोग्य यंत्रणेचे प्रमुख असलेले भालेराव यांच्याकडे स्वाईन फ्लूबाबत अत्यंत तोकडी माहिती उपलब्ध असून ते या आजाराने झालेल्या अधिकृत बळींबाबतही अनभिज्ञ असल्याचे दिसते. आठ लाख लोकसंख्येच्या अमरावती शहरात स्वाईन फ्लूने आठ बळी घेतले आहेत. त्यामुळे २० लाख लोकसंख्येच्या ग्रामीण भागात एकच बळी असावा काय, याबाबत साशंकता आहे. स्वाईनफ्लयूबाबत महापालिकेत दर सोमवारी बैठक घेतली जाते. महापालिकेच्या वैद्यकीय आरोग्य अधिकारी सीमा नैताम यांच्यानुसार महापालिका क्षेत्रात जानेवारी ते १४ जुलैपर्यंत ९४ स्वॅब तपासणीकरिता पाठविण्यात आलेत. त्यापैकी ९२ नमुन्यांचा अहवाल प्राप्त झाला असून २८ रूग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत तर ६४ स्वॅबचा अहवाल निगेटिव्ह आहे. आतापर्यंत शहरात आठ जणांचा स्वाईन फ्लूने मृत्यू झाला. यातुलनेत जिल्ह्याच्या ग्रामीण भागात या आजाराने केवळ एकच व्यक्ती मरण पावल्याचा केलेला दावा वास्तवाशी विसंगत असल्याचे मत वैद्यकीय तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. केवळ अमरावती शहरापुरत्या मर्यादित असलेल्या महापालिका यंत्रणेने ९४ स्वॅब तपासणीकरिता पाठविले असताना डीएचओ कार्यालयाने केवळ ५० जणांचे स्क्रिनिंग केल्याचा दावा केला आहे. जिल्ह्याचा ग्रामीण भाग आणि महापालिका क्षेत्रातील लोकसंख्येमध्ये तब्बल २० लाखांची तफावत असताना ग्रामीण भागातील आकडेवारीमध्ये लपवाछपवीचा प्रकार तर नाही ना, अशी शंका उपस्थित होत आहे.
तालुकानिहाय आकडेवारी नाहीच
जिल्हा आरोग्य यंत्रणेचे नेतृत्व करणाऱ्या झेडपीच्या आरोग्य विभागाकडे स्वाईन फ्लूबाबत तालुकानिहाय अधिकृत आकडेवारी उपलब्ध नाही. आतापर्यंत तालुकानिहाय किती नागरिकांचे स्वॅब तपासणीकरिता पाठविण्यात आले, त्यापैकी किती पॉझिटिव्ह, निगेटिव्ह निघालेत, याबाबत हा विभाग कमालीचा अनभिज्ञ आहे. दिवसा उकाडा आणि मध्येच पावसाच्या सरी हे वातावरण स्वाईन फ्लूसाठी पोषक ठरत आहे. त्यामुळे मागच्या काही दिवसांत स्वाईन फ्लूच्या रुग्णांमध्ये वाढ होत असताना जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाची अनास्था नागरिकांसाठी जीवघेणी ठरली आहे.
पुणे, मुंबईसारख्या शहरापेक्षा अमरावतीत स्वाईन फ्लूचा संसर्ग कमी आहे. याबाबत लोकांना तत्काळ आरोग्य सेवा पुरविण्यासाठी आपली यंत्रणा सज्ज आहे. ग्रामीण भागातील मृत्यूदर कमी असल्याचेही आढळून येत आहे.
- अरुण राऊत,
जिल्हा शल्य चिकीत्सक.
मार्च, एप्रिल महिन्यात स्वाईन फ्लूचे काही रुग्ण आढळून आलेत. ग्रामीण भागात स्वाईन फ्लूने केवळ एकाचा मृत्यू झाला आहे, तर ५० जणांचे ‘स्क्रिनिंग’करण्यात आले. समाजात या संसर्गजन्य आजाराबाबत जनजागृती होणे आवश्यक आहे.
- नितीन भालेराव,
आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद