स्वाईन फ्लूची स्वॅब किट उपलब्ध नाही, निदान होणार कसे?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2018 10:21 PM2018-08-25T22:21:56+5:302018-08-25T22:22:17+5:30
जीवघेण्या स्वाईन फ्लू आजार निदानासाठी उपयुक्त पडणारी किटच आरोग्य प्रशासनाकडे उपलब्ध नसल्याची धक्कादायक बाब पुढे आली आहे. त्यामुळे स्वाईन फ्लूच्या रुग्णांचे निदान होणार तरी कसे, असा प्रश्न उभा ठाकला आहे. खासगी रुग्णालयात स्वाईन फ्लूचे संशयित रुग्ण आढळून आले आहेत, मात्र, शासकीय यंत्रणेजवळ स्वॅब किटच उपलब्ध नसल्यामुळे त्यांना तपासणीसाठी आता खासगी क्षेत्रात धाव घ्यावी लागत असल्याचे चित्र अमरावती शहरात पाहायला मिळत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : जीवघेण्या स्वाईन फ्लू आजार निदानासाठी उपयुक्त पडणारी किटच आरोग्य प्रशासनाकडे उपलब्ध नसल्याची धक्कादायक बाब पुढे आली आहे. त्यामुळे स्वाईन फ्लूच्या रुग्णांचे निदान होणार तरी कसे, असा प्रश्न उभा ठाकला आहे. खासगी रुग्णालयात स्वाईन फ्लूचे संशयित रुग्ण आढळून आले आहेत, मात्र, शासकीय यंत्रणेजवळ स्वॅब किटच उपलब्ध नसल्यामुळे त्यांना तपासणीसाठी आता खासगी क्षेत्रात धाव घ्यावी लागत असल्याचे चित्र अमरावती शहरात पाहायला मिळत आहे.
'एच १ एन १' व्हायरसने उद्भवणारा स्वाईन फ्लू आजाराने राज्यभरात हळूहळू पाय पसरविले आहे. आतापर्यंत राज्यात १८१ जणांचे बळी गेले असून, ९०० वर रुग्णांना स्वाईन फ्लूची लागण झाल्याची बाब पुढे आली होती. त्यात सर्वाधिक रुग्ण पुणे शहरात आढळून आलेत. काही दिवसांपूर्वीच पुणे येथे तीन जणांचे स्वाईन फ्लूने मृत्यू झाल्याची माहिती पुढे आली होती. अमरावतीमध्येही मागील वर्षांत स्वाईन फ्लूचे रुग्ण आढळून आले असून, काहींचे मृत्यू झालेत आहे.
स्थानिक आरोग्य प्रशासनाला मध्यंतरी पीडिएमसी व एका खासगी रुग्णालयातील संशयित रुग्णांचे स्वॅब नमुने घेण्यासाठी बोलाविण्यात आले होते. मात्र, स्वॅब किट नसल्यामुळे त्या रुग्णांची नोंद घेतली गेली नाही. काही दिवसांपूर्वीच बालाजी प्लॉट परिसरात स्वाईन फ्लूचा पॉझिटिव्ह रुग्ण आढळला. त्यांना नागपूर येथे हलविण्यात आले होते. शुक्रवारी शहरातील आणखी एका खासगी रुग्णालयात संशयित रुग्ण आढळून आला असून, त्यासंबंधाने महापालिकेच्या आरोग्य विभागाला कळविण्यात आले आहे. मात्र, किटच उपलब्ध नसल्याचे कारण पुढे करण्यात आले.
स्वाईन फ्लूची स्वॅब किट आरोग्य विभागाकडे नाहीत, त्यांना किटच्या मागणीचा प्रस्ताव पाठविला आहे. खासगी क्षेत्रातून किट बोलावण्यात आल्या असून अद्याप त्या प्राप्त झालेल्या नाहीत.
- श्यामसुंदर निकम,
जिल्हा शल्यचिकित्सक