प्रतीक शार्प माईंड; टिके हार्डकोअर गुन्हेगार!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 15, 2021 05:00 AM2021-12-15T05:00:00+5:302021-12-15T05:01:01+5:30
डी-मार्टच्या बाजूच्या रस्त्याने एका महिलेला अडवून तिच्या गळ्यातील ३५ ग्रॅमपैकी १५ ग्रॅम वजनाचे मंगळसूत्र घेऊन रोहन व प्रतीक वाणी हे रफूचक्कर झाले होते. रोहन ज्ञानेश्वर टिके (२३, रा. सेलू, वर्धा), प्रतीक सुनील वाणी (२२, रा. आंजी, वर्धा) अशी मुख्य आरोपींची, तर त्यांना सहकार्य करणाऱ्या व निवारा देणाऱ्यांमध्ये प्रतीक प्रकाश काळे (२२, रा. आंजी) व आयुष रमेश चांदेकर (२२, रा. वर्धा) यांचा समावेश आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : झटापटीदरम्यान मोबाईल पडल्याने पोलिसांच्या हाती लागलेल्या दोन चेनस्नॅचर्स व त्यांच्या दोन सहकाऱ्यांना १७ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. त्यांच्याकडून चार मोबाईल, डी-मार्टनजीकच्या घटनेतील ६० हजार रुपयांचे मंगळसूत्र व त्याच गुन्ह्यात वापरलेली चोरीची दुचाकी जप्त करण्यात आली. त्यातील मुख्य आरोपी असलेला रोहन टिके हा हार्डकोअर गुन्हेगार, तर बी.टेक.चा विद्यार्थी असलेला प्रतीक काळे हा शार्प माईंड असल्याची माहिती राजापेठचे ठाणेदार मनीष ठाकरे यांनी दिली.
बडनेरा रोडवरील डी-मार्टजवळ १२ डिसेंबर रोजी सायंकाळी चेनस्नॅचिंग करताना एका आरोपीचा मोबाईल घटनास्थळी पडला होता. त्या मोबाईलमधील क्रमांक ट्रेस करून राजापेठ पोलिसांनी सोमवार १३ डिसेंबर रोजी सकाळी चौघांना ताब्यात घेतले. त्यातील दोघांनी डी-मार्टजवळ घडलेल्या गुन्ह्याची कबुली दिली आहे.
डी-मार्टच्या बाजूच्या रस्त्याने एका महिलेला अडवून तिच्या गळ्यातील ३५ ग्रॅमपैकी १५ ग्रॅम वजनाचे मंगळसूत्र घेऊन रोहन व प्रतीक वाणी हे रफूचक्कर झाले होते. रोहन ज्ञानेश्वर टिके (२३, रा. सेलू, वर्धा), प्रतीक सुनील वाणी (२२, रा. आंजी, वर्धा) अशी मुख्य आरोपींची, तर त्यांना सहकार्य करणाऱ्या व निवारा देणाऱ्यांमध्ये प्रतीक प्रकाश काळे (२२, रा. आंजी) व आयुष रमेश चांदेकर (२२, रा. वर्धा) यांचा समावेश आहे. मंगळवारी दुपारी चौघांनाही न्यायालयाने १७ पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली. दरम्यान, घटनास्थळी पडलेला मोबाईल टिकेचा होता, असे तपासात स्पष्ट झाले आहे.
मौजेसाठी चेनस्नॅचिंग
रोहन टिके हा प्रतीक काळेचा मावसभाऊ आहे, तर चौघेही मूळचे वर्धा जिल्ह्यातील आहेत. येथे बीसीए करणारा आयुष चांदेकर याच्या भावाचे वर्धा येथे बेकरीचे दुकान आहे. तेथे रोहन टिके व अन्य तीन आरोपींची ओळख झाली. आयुष व प्रतीक काळे हे नागपूरला सोबत बी.टेक. करीत होते. मात्र, आयुषने ते बदलवून अमरावती येथे बीसीएला प्रवेश घेतला. प्रतीक काळे हा वर्धेहून टिकेचा मोबाईल हँडल करत होता. तो मोबाईल तंत्रात मास्टरमाईंड असल्याची प्राथमिक माहिती आहे. टिके व प्रतीक वाणी हे केवळ मौजमजा करण्यासाठी चेनस्नॅचिंग करीत होते. चेनस्नॅचिंगच्या घटनेत प्रत्यक्ष सहभाग नसला तरी प्रतीक काळे हा त्यांना मदत करीत होता, तर टिके व वाणी यांनी चेनस्नॅचिंग केली, हे माहीत असूनही चांदेकरने त्या दोघांना सहारा दिला होता.
चावींचा गुच्छा आढळला
प्रतीक वाणी व टिकेजवळ दुचाकीच्या चाव्यांचा मोठा गुच्छा आढळून आला. त्या दोघांनीच शनिवारी खोलापुरी गेट ठाण्याच्या हद्दीतून दुचाकी चोरली होती. काळेव्यतिरिक्त ते दोघेही आयुष चांदेकरच्या येथील खोलीत मुक्कामी होते. यातील प्रतीक वाणी हा वाहन चालविण्यात तरबेज आहे.