दानवेंच्या पुतळ्याचे प्रतिकात्मक दहन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2017 01:35 AM2017-05-12T01:35:16+5:302017-05-12T01:35:16+5:30
आधीच विविध संकटांचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांना दिलासा देण्याऐवजी त्यांच्यासाठी खालच्या स्तरातील शब्दांचा वापर
निषेध : जिल्हा काँग्रेस आक्रमक, झेडपीच्या प्रवेशद्वारासमोर नारेबाजी
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : आधीच विविध संकटांचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांना दिलासा देण्याऐवजी त्यांच्यासाठी खालच्या स्तरातील शब्दांचा वापर करणाऱ्या आणि शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळणारे भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या विरोधात जिल्हाभरात तीव्र असंतोष उफाळून आला आहे. जिल्हा ग्रामीण काँग्रेसने जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख यांच्या नेतृत्वात झेडपीच्या मुख्य प्रवेशव्दारा समोर दानवेंच्या पुतळयाचे गुरूवारी प्रतिकात्मक दहन केले.
‘एक लाख टन तूर खरेदी केली तरी रडतात साले’ असे वक्तव्य भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी १० मे रोजी जालना येथे आयोजित एका कार्यक्रमात केल्याने सर्वत्र तीव्र संताप व्यक्त होत आहे. याच पार्श्वभूमिवर जिल्हा काँग्रेस कमिटीने दानवेंच्या बेताल वक्तव्याचा चांगलाच समाचार घेतला. यावेळी दानवेंच्या विरोधात नारेबाजी करण्यात आली. यामुळे जिल्हा परिषद परिसर दणाणून गेला होता.
आंदोलनात जिल्हा परिषदेतील काँग्रेससह शिवसेनेचे पदाधिकारीही सहभागी झाले होते. जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष बबलू देशमुख, आ.वीरेंद्र जगताप, झेडपी अध्यक्ष नितीन गोंडाणे, सभापती जयंत देशमुख, बळवंत वानखडे, सदस्य प्रकाश साबळे, अभिजित बोके, महेंद्रसिंग गहेलवार, बाळासाहेब हिंगणीकर, दयाराम काळे, गजानन राठोड, विक्रम ठाकरे, वनिता पाल, पूजा हाडोळे, वंदना करूले, पूजा आमले, सीमा सारगे, राधिका घुईखेडकर, वैशाली बोरकर, अनिता मेश्राम, प्रियंका दगडकर, सुरेश निमकर आदींसह काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.