पूर्णानगरला शासनाचा प्रतिकात्मक अंत्यविधी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 24, 2017 11:21 PM2017-11-24T23:21:26+5:302017-11-24T23:22:46+5:30
गुलाबी बोंडअळीने संपूर्ण कपाशीचे पीक उद्ध्वस्त झाले असताना शासनस्तरावर कोणताही निर्णय नाही.
आॅनलाईन लोकमत
अमरावती : गुलाबी बोंडअळीने संपूर्ण कपाशीचे पीक उद्ध्वस्त झाले असताना शासनस्तरावर कोणताही निर्णय नाही. यामुळे भातकुली तालुक्यातील पूर्णानगर येथील संतप्त शेतकऱ्यांनी शुक्रवारी शासनाच्या निषेधाच्या घोषणा देत मुख्यमंत्र्यासह कृषिमंत्र्यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन व अंत्यविधी केला.
पूर्णानगर व परिसरातील बीटी कपाशीवर गुलाबी बोंड अळीचा मोठ्या प्रमाणावर हल्ला झाला. याप्रकरणी कृषी विभागाद्वारा कोणतीही हालचाल न झाल्याने शेतकऱ्यांनी कृषी विभागाकडे लेखी तक्रारी केल्यात. त्यानंतर जिल्हा समितीने पाहणी केली असता, कपाशीचे ९६ टक्के बोंडे किडली असल्याचा अहवाल शासनाला दिला. मात्र, यानंतरही शेतकऱ्यांना भरपाई मिळावी, यासाठी कोणताही शासनादेश झालेला नाही. उत्पादन खर्च निघत नसल्याने शेतकऱ्यांनी कपाशीच्या उभ्या पिकात नांगर फिरविला. कृषी विभागातील समितीच्या अहवालानुसार या परिसरातील शेतकऱ्यांचे एकरी किमान सव्वा लाख रुपये नुकसान झाले असताना, बियाणे कंपनी किंवा शासनाने शेतकऱ्यांना भरपाई दिली नाही. त्यामुळे संतप्त शेतकºयांनी निषेधाच्या घोषणा देत तत्काळ भरपाईची मागणी केली. आंदोलनात बीटी बोंडअळी त्रस्त समितीचे उमेश महिंगे, संजय माकोडे, प्रमोद इटके, अंकुश जुनघरे, कळसकर गुरूजी, हरिभाऊ तायडे, विजय गुंडाले, छोटू देशमुख आदी उपस्थित होते.
बाधित खरीप अन् शेतकऱ्यांचा आक्रोश
यंदाचा खरीप हंगाम अपुऱ्या पावसामुळे बाधित झाल्याने मूग, उडीद व सोयाबीन उद्ध्वस्त झाले. यामधून जी पिके वाचलीत, त्या शेतमालास हमीभावही मिळत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांची सर्व मदार कपाशीवर होती. मात्र, यंदा बीटी कपाशीवर मोठ्या प्रमाणात गुलाबी बोंड अळीचा हल्ला झाल्याने शेतकºयांना उत्पादनखर्चही निघणे मुश्कील झाले आहे.