राजुरा येथे पोहोचली यंत्रणा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2021 04:13 AM2021-04-27T04:13:05+5:302021-04-27T04:13:05+5:30
फोटो पी २६ राजुराबाजार राजुरा बाजार : येथे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढीस लागल्याने महसूल व आरोग्य प्रशासन राजुरा ...
फोटो पी २६ राजुराबाजार
राजुरा बाजार : येथे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढीस लागल्याने महसूल व आरोग्य प्रशासन राजुरा बाजारमध्ये पोहोचले. ‘राजुरा येथे कोरोनाचा उद्रेक’ या मथळ्याखाली २३ एप्रिल रोजी ‘लोकमत’ने वृत्त प्रकाशित केले. त्याची दखल घेत रविवारी महसूल व आरोग्य प्रशासनच्या अधिकाऱ्यांनी गावाला भेट देऊन स्थानिक प्रशासनास उपाययोजनांचे निर्देश दिले.
राजुरा बाजार येथे कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढीस असल्याने यासंदर्भात स्थानिक प्रशासनाकडून ठोस उपाययोजना होताना दिसून येत नव्हती. राजुरा हे गाव परिसरातील बाजारपेठ म्हणून तालुक्यात प्रसिद्ध आहे. येथेच कोरोनाचा 'हॉट स्पॉट' बनला आहे. तालुक्यातील इतर गावांच्या तुलनेत सर्वाधिक रुग्ण या गावात आहे. पॉझिटिव्ह रुग्ण सर्रासपणे गावात फिरत होते. सोडियम हायपोक्लोराईडची फवारणी होत नव्हती. रुग्णाची चाचणीसाठी अहवाल प्राप्त होईस्तोवर घरातच राहण्याची गरज आहे, असे निक्षून सांगितले.
आरोग्य सुविधांचा बोजवारा उडाला होता, महसूल यंत्रणा ठप्प होती. बातमी प्रकाशित होताच रविवारी दुपारी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गावास भेट देऊन स्थानिक प्रशासनास तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश दिले. गावातील बाजारपेठ ही शासकीय नियोजनाप्रमाणे बंद झालीच पाहिजे, असेही आदेश दिले. कुणीही मनमानी करीत असल्यास व्हिडीओ शूटिंग करून त्यांच्याविरोधात कायदेशीर कारवाईचे आदेश दिले. गावकऱ्यांनी उपस्थित अधिकाऱ्यांसमोर तक्रारीचा पाढाच वाचला. पोलीस प्रशासनाने गावात दररोज एक फेरी करावी, ही आग्रही मागणी माजी सरपंच किशोर गोमकाळे यांनी केली.
याप्रसंगी उपविभागीय अधिकारी नितीनकुमार हिंगोले, जिल्हा परिषद सदस्य राजीव बहुरूपी, तहसीलदार किशोर गावंडे, तालुका आरोग्य अधिकारी अमोल देशमुख, ठाणेदार सुनील पाटील, नायब तहसीलदार देवानंद ढबाले, मंडळ अधिकारी गुल्हाने, तलाठी विनोद पवार, डॉ शुभा शेळके, वीरेंद्र कनाटे, सरपंच नीलेश धुर्वे, ग्रामविकास अधिकारी मनोज राऊत, माजी सरपंच किशोर गोमकाळे, मनोहर भोंडे, विद्या कुयटे, रजनी भोंडे, इतर ग्रामपंचायत कर्मचारी व गावकरी उपस्थित होते.