वडाळीतील वणव्यामुळे ‘टी-२’ चिरोडी जंगलात
By Admin | Published: April 6, 2017 12:03 AM2017-04-06T00:03:31+5:302017-04-06T00:03:31+5:30
वाढत्या तापमानामुळे मनुष्यच काय पण वन्यप्राणी देखील हैराण झाले आहेत.
अमरावती : वाढत्या तापमानामुळे मनुष्यच काय पण वन्यप्राणी देखील हैराण झाले आहेत. उन्हाच्या होरपळीपासून वाचण्यासाठी या वन्यपशुंनी सुरक्षित स्थळी आडोसा घेतला आहे. भरीस भर म्हणून वडाळी वनपरिक्षेत्रात वणवे पेटू लागल्याने जगंलचा राजा "टी-२" आता चांदूररेल्वे वनपरिक्षेत्रात म्हणजे चिरोडी जंगलात सुरक्षेच्या कारणास्तव शिरल्याचे निदर्शनास आले आहे. १ एप्रिल रोजी ‘टी-२’ चांदूररेल्वे वनपरिक्षेत्रातील ट्रॅप कॅमेऱ्यात कैद झाला असून ४ एप्रिल रोजी तो सांवगा विठोबाच्या जंगलात सुद्धा दृष्टीस पडला आहे, हे विशेष.
कातळबोडी जंगलातील "टी-२" हा वाघ स्थंलातरण करून पोहरा-मालखेड जंगलात वास्तव्यास आला आहे. पूर्वी त्याचे ‘नवाब’ हे नाव कातळबोडीत प्रचलित झाले होते. मात्र, आता अमरावती वनविभागाने त्याचे पोहरा मालखेड रिझर्व्ह फॉरेस्टमध्ये ‘टी-२’ असे नामकरण केले आहे. ‘टी-२’च्या मुक्तसंचारावर वनविभागाचे ‘डेली मॉनिटरिंग’ सुरू आहे. ट्रॅप कॅमेऱ्यांद्वारे ‘टी-२’ वर विशेष लक्ष केंद्रीत करण्यात आले असून दररोज ट्रॅप कॅमेऱ्यांमध्ये ‘टी-२’ कैद झाला की नाही, याकडे लक्ष ठेवले जात आहे. चांदूररेल्वे वनपरिक्षेत्रातील पोहरा-मालखेड जगंलात सर्वप्रथम ‘टी-२’ दृष्टीस पडला. त्यानंतर तो संपूर्ण जगंलात मुक्तसंचार करीत वडाळी वनपरिक्षेत्रात दाखल झाला. हिलटॉप पार्इंटपर्यंत त्योचे आगमन झाल्याचे मध्यंतरी निदर्शनास आले होते.
ट्रॅप कॅमेऱ्यात कैद
अमरावती : मात्र, सात दिवसांपासून ‘टी-२’ वडाळी वनपरिक्षेत्रातील ट्रॅप कॅमेऱ्यात कैद न झाल्याने वनविभाग चिंताग्रस्त झाला होता. मात्र, १ एप्रिल रोजी ‘टी-२’चे छायाचित्र चांदूररेल्वे वनपरिक्षेत्रातील ट्रॅप कॅमेऱ्यात कैद झाल्यामुळे वनविभागाने सुटकेचा नि:श्वास सोडला. ‘टी-२’ वडाळी वनपरिक्षेत्र सोडून चिरोडी जंगलात अचानक का निघून गेला, हा संशोधनाचा विषय बनला होता. मात्र,मागील आठवड्यात वडाळी वनपरिक्षेत्रातील भानखेडा, जेवड बिटसह अन्य काही ठिकाणी वणवा पेटल्याने ‘टी-२’ ने चिरोडीकडे धाव घेतल्याचे निदर्शनास आले आहे.
१ एप्रिलला ट्रॅप कॅमेऱ्यात कैद : पाण्याच्या शोधात वन्यप्राणी सैरभैर
जंगलात २४ तास पहारा
चांदूररेल्वे वनपरिक्षेत्रातील वन्यप्राण्यांच्या सुरक्षेसाठी वनमजूर रात्रंदिवस पहारा देत आहेत. वनपरिक्षेत्र अधिकारी अनंत गावंडे यांनी वन्यप्राण्यांच्या सुरक्षेसाठी वरूडा व पोहरा जगंलात दोन झोपड्या बांधून वनमजुरांना तैनात केले आहे. अद्याप चांदूररेल्वे वनात वणवा पेटला नसल्याने ‘टी-२’ या जंगलात स्वत:ला अधिक सुरक्षित समजत असावा, अशी वनवर्तुळात चर्चा आहे.
वन्यप्राण्यांसाठी १५ पाणवठे
चांदूररेल्वे वनपरिक्षेत्रात वन्यप्राण्यांसाठी तब्बल १५ पाणवठे तयार करण्यात आले आहेत. त्यामध्ये ५ कृत्रिम, ४ नैसर्गिक व ५ पाणवठ्यावर पाईपलाईनद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. वन्यप्राणी पाण्यासाठी शहर व गावाकडे धाव घेऊ नयेत, याकरिता चांदूररेल्वे वनपरिक्षेत्र अधिकारी अनंत गावंडे यांनी सर्व यंत्रणा सज्ज ठेवली आहे.
पक्ष्यांसाठी वडाळी जंगलात ५०० जलपात्र
उन्हाळ्यात जंगलातील पाण्याचे नैसर्गिक स्त्रोत आटतात. अशावेळी पक्ष्यांची तहान भागविण्याचे संकट निर्माण होते. यासाठी वडाळीच्या जंगलात ५०० जलपात्र ठेवण्यात येणार असल्याची माहिती वडाळी वनपरिक्षेत्र अधिकारी पडगव्हाणकर यांनी दिली. वन्यप्रेमी नीलेश कांचनपुरे यांनी जलपात्रे उपलब्ध करून दिली असून वनविभाग व वन्यप्रेमींद्वारे संयुक्तरित्या हा उपक्रम सुरू आहे.
‘टी-२’ सध्या चांदूररेल्वे वनपरिक्षेत्रात गेला आहे. त्यामागे वडाळी जंगलात लागलेला वणवा, हे प्रमुख कारण असू शकते. दोन्ही वनपरिक्षेत्रात वन्यप्राण्यांसाठी मोठ्या प्रमाणात पाणवठे तयार करण्यात आले आहे.
-हेमंतकुमार मीणा, उपवनसरंक्षक, अमरावती वनविभाग