तडीपाराचा मुक्त हैदोस; गर्भार गायीला भोसकून केले ठार, हॉटेल कर्मचाऱ्यावर प्राणघातक हल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2022 12:19 PM2022-09-22T12:19:28+5:302022-09-22T12:24:31+5:30

नांदगाव पेठ, फ्रेजरपुरा ठाण्यात गुन्हा दाखल

tadipar criminals terror in amravati; Pregnant cow stabbed to death, hotel employee attacked | तडीपाराचा मुक्त हैदोस; गर्भार गायीला भोसकून केले ठार, हॉटेल कर्मचाऱ्यावर प्राणघातक हल्ला

तडीपाराचा मुक्त हैदोस; गर्भार गायीला भोसकून केले ठार, हॉटेल कर्मचाऱ्यावर प्राणघातक हल्ला

googlenewsNext

अमरावती : शहर तथा जिल्ह्यातून दोन वर्षांकरिता तडीपार करण्यात आलेल्या एका कुख्यात गुन्हेगाराने अन्य दोन साथीदारांसमवेत मंगळवारी रात्री नांदगाव पेठ व फ्रेजरपुरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत हैदोस घातला. त्यांनी आधी एका हॉटेल कर्मचाऱ्यावर प्राणघातक हल्ला केला, तर रात्रीच्या वेळी एका गर्भार गायीवर चाकूने वार करत तिला ठार केले. याप्रकरणी दोन स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

याप्रकरणी नांदगाव पेठ पोलिसांनी तडीपार आरोपी ऋषिकेश ऊर्फ गोंडी ऊर्फ उमेश मोडक (२५, राहुलनगर, बिच्छू टेकडी), विशाल रतनसिंह राजपूत (२४, व्यंकय्यापुरा) व शेख मोईन शेख मुख्तार (२०, नांदगाव पेठ) या तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करून तिघांनाही अटक केली आहे.

सराईत गुन्हेगार गोंडीला जिल्ह्यातून तडीपार करण्यात आले आहे. मात्र, तो त्या आदेशाचे उल्लंघन करून शहरात दाखल झाला. मंगळवारी रात्री तो साथीदार विशाल व शेख मोईनसह नागपूर मार्गावरील एका बार ॲण्ड हॉटेलमध्ये गेला. यावेळी बार बंद झाला होता. गोंडीने चौकीदार जंगबहादूर राठोड (५०) व रावसाहेब नितनवरे (५९, दोघेही रा. रहाटगाव) यांना गेट उघडण्यास सांगितले. बार बंद झाल्याने त्यांनी गेट उघडण्यास नकार दिला. त्यावेळी गोंडीसह विशाल व शेख मोईन यांनी चौकीदार जंगबहादूर राठोड यांच्यावर चाकूने जीवघेणा हल्ला चढविला. त्यानंतर त्यांनी तेथून पळ काढला. याप्रकरणी रावसाहेब नितनवरे यांनी नांदगाव पेठ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.

मुक्या प्राण्याचा जीव घेतला

त्या घटनेनंतर गोंडीसह त्याचे साथीदार व्यंकय्यापुरात आले. यावेळी गोंडीने व्यंकय्यापुरा येथील रहिवासी तथा पशुपालक राजा श्याम यादव (२१) याच्या गर्भार गायीची चाकूने भोसकून हत्या केली. दरम्यान, पहाटेच्या सुमारास नांदगाव पेठ पोलिसांनी गोंडी, विशाल व शेख मोईनला अटक केली. दुसरीकडे फ्रेजरपुरा ठाण्यातही राजा यादव यांच्या तक्रारीवरून गोंडीसह त्याच्या दोन साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

फ्रेजरपुरा ठाण्यातील डीबी स्कॉड विड्राल

दरम्यान तडीपार आरोपी मुक्तपणे शहरात वावरतो, तो मुक्त हैदोसदेखील घालतो, तर डीबी स्कॉड करतो तरी काय, अशी विचारणा करत पोलीस आयुक्त डॉ. आरती सिंह यांनी फ्रेजरपुरा पोलीस ठाण्यातील डीबी स्कॉड विड्रॉल केला आहे. डीबी स्कॉडमधील सर्व अंमलदारांना पोलीस मुख्यालयाशी संलग्न करण्यात आले आहे.

Web Title: tadipar criminals terror in amravati; Pregnant cow stabbed to death, hotel employee attacked

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.