दारिद्र्यरेषेखालील महिलांना ‘ताजमहाल पॅलेस’ची सफर
By admin | Published: April 8, 2016 11:57 PM2016-04-08T23:57:50+5:302016-04-08T23:57:50+5:30
सुवर्ण जयंती स्वयंरोजगार योजनेतील महिला, समूह संघटना आणि प्रकल्प अधिकारी वर्गाला आंतरराष्ट्रीय बाजारपेठ उपलब्ध व्हावी,...
‘स्टडी टूर’मध्ये नऊ लाखांचा घोटाळा : गंभीर अनियमितता
अमरावती : सुवर्ण जयंती स्वयंरोजगार योजनेतील महिला, समूह संघटना आणि प्रकल्प अधिकारी वर्गाला आंतरराष्ट्रीय बाजारपेठ उपलब्ध व्हावी, यासाठी एकदिवसीय अभ्यास सहल आयोजित करण्यात आली. अमरावती महापालिका क्षेत्रातून यात सहभागी झालेल्यांना ‘ताजमहाल पॅलेस’ या महागड्या हॉटेलची सफर घडविण्यात आली.
महिला बचत गटातील वस्ती स्वयंसेविका महिलांसाठी वर्ल्ड ट्रेड सेंटर, मुंबई येथे एक दिवसाची वर्ल्ड ट्रेनिंग व ‘इकॉनॉमी आॅफ दी इंडिया’ या विषयाची अभ्यास सहल सन २०१४ मध्ये काढण्यात आली. या एकदिवसीय अभ्यास सहलीवरील खर्चामध्ये मोठा गोंधळ करण्यात आला. या संपूर्ण खर्चामधील ९ लाख १८ हजारांच्या रकमेवर आक्षेप घेण्यात आला.
योजना संपुष्टात आल्यानंतरही निधी
सुवर्ण जयंती शहरी रोजगार योजना ३१ मार्च २०१४ रोजी संपुष्टात आली असताना सन २०१३-१४ मधील अखर्चित निधीमधील काही रक्कम उपायुक्त (सामान्य) यांचे नावे काढून २२० प्रशिक्षणार्थ्यांकरिता प्रती प्रशिक्षणार्थी १९ हजार याप्रमाणे ४१ लाख ८० हजार इतक्या रकमेपैकी २० लाख ९० हजार अग्रीम देण्यात आली. हा निधी प्रकल्प संचालकास्तरावरून उद्योगलक्ष्मी, पुणे यांना देण्यात आला. योजना संपुष्टात आली असताना योजनेवरील अखर्चित निधी शासनाला परत करणे आवश्यक होते. मात्र, तसे न झाल्याने या टूरमध्ये अनियमितता झाल्याचे निरीक्षण नोंदविले गेले.
आंतरराष्ट्रीय प्रशिक्षणाचा लाभ कुणाला ?
योजनेचा मूळ उद्देश दारिद्र्यरेषेखालील महिलांना रोजगार व रोजगारातून स्वयंरोजगार उपलब्ध करून देणे असताना लक्षावधी रुपये ‘स्टडी टूर’वर खर्च करण्यात आले. उल्लेखनीय म्हणजे मुंबईतील महागड्या हॉटेलसह अन्य खर्चाचा व त्यातून साध्य केलेल्या कामाचा कार्यपूर्ती अहवाल देण्यात आला नाही. त्यामुळे योजनेचा मूळ उद्देश केवळ कागदावरच राहिला.
वर्ल्ड ट्रेड सेंटरची
इमारत भाड्याने
महापालिकेने ‘कॉर्पोरेट आंतरराष्ट्रीय बाजारपेठ स्टडी टूर कॉन्फरस’करिता चक्क ‘वर्ल्ड ट्रेड सेंटर’ची इमारत भाड्याने घेतली. एकाच दिवशी मुंबईतील तीन वेगवेगळ्या महागड्या इमारतीमधील हॉल भाड्याने घेण्यात आले व त्याचा खर्च महापालिकेच्या तिजोरीतून झाला. याबाबत जोडली गेलेली देयके सदोष आणि संशयास्पद आहेत.