घरकूल घोटाळ्यातील दोषींवर कारवाई करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 2, 2018 11:45 PM2018-05-02T23:45:40+5:302018-05-02T23:45:40+5:30
तीव्र उन्हामुळे अंगाची काहिली होत असताना, शहरातील ज्येष्ठ नागरिक गौतम जवंजाळ हे घरकूल घोटाळ्यातील दोषींवर फौजदारी कारवाईच्या मागणीसाठी १ मेपासून न.प. प्रवेशव्दारासमोर उपोषणाला बसले आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
चांदूर रेल्वे : तीव्र उन्हामुळे अंगाची काहिली होत असताना, शहरातील ज्येष्ठ नागरिक गौतम जवंजाळ हे घरकूल घोटाळ्यातील दोषींवर फौजदारी कारवाईच्या मागणीसाठी १ मेपासून न.प. प्रवेशव्दारासमोर उपोषणाला बसले आहेत. अहवालातील दोषी अधिकारी, पदाधिकाºयांच्या नावाचे छोटे-छोटे फलक तयार करून त्यांनी ते न.प. प्रवेशद्वारावर तोरणासमान बांधल्यामुळे लक्षवेधक ठरले आहे.
शासनाच्या घरकुल योजनेत गोरगरिबांना हक्काचे घर प्राप्त होणे आवश्यक होते. परंतु, येथील नगर परिषदेत या योजनेत खरे लाभार्थी पात्र ठरविण्याऐवजी कागदपत्रांची योग्य छाननी न करता अपात्र नागरिकांंना लाभ देण्यात आला. सदर घरकुल घोटाळा बाहेर काढण्यासाठी गौतम अण्णाजी जवंजाळ १० वर्षांपासून सतत लढा देत आहेत. यातील दोषींवर फौजदारी कारवाईसाठी गौतम जवंजाळ यांनी दोन वेळा उपोषण तसेच आंदोलने केली. त्याबाबत पुरावे दिलेत. मंत्रालयातून जिल्हाधिकाºयांचे पत्र आले. अहवाल तयार झाला. जिल्हाधिकाºयांच्या अहवालात दोषी अधिकारी, कर्मचारी, पदाधिकारी, सर्व्हे एजन्सीचे नाव असून, मुख्याधिकाºयांना गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. मात्र, राजकीय दबावामुळे व अधिकारी-कर्मचारी यांना वाचविण्यासाठी मुख्याधिकारी टाळाटाळ करीत असल्याचा आरोप गौतम जवंजाळ यांनी केला आहे.
एका नगरसेवकाची मध्यस्थी?
गौतम जवंजाळ राहतात, त्या नगरातील एका नगरसेवकाच्या माध्यमातून उपोषण सोडविण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्यांनी जवंजाळ यांच्या घरच्यांना समजविण्याचा प्रयत्न केल्याची चर्चा सुरू आहे.