मांडवा झोपडपट्टी अग्निकांडातील दोषींवर कारवाई करा
By admin | Published: January 3, 2016 12:40 AM2016-01-03T00:40:00+5:302016-01-03T00:40:00+5:30
बजरंग नगरातील मांडवा झोपडपट्टीत अग्निकांड घडविणाऱ्या दोषींवर कठोर कारवाईची मागणी झोपडपट्टीवासीयांनी नगरसेवक प्रदीप दंदे यांच्या...
निवेदन : बजरंगनगर, झोपडपट्टीवासीयांची पोलीस आयुक्तांना मागणी
अमरावती : बजरंग नगरातील मांडवा झोपडपट्टीत अग्निकांड घडविणाऱ्या दोषींवर कठोर कारवाईची मागणी झोपडपट्टीवासीयांनी नगरसेवक प्रदीप दंदे यांच्या नेतृत्वात पोलीस आयुक्त राजकुमार व्हटकर यांना बुधवारी निवेदनातून केली.
गाडगेनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मांडवा झोपडपट्टीला बुधवारी रात्री आग लागली. यामध्ये तब्बल ३१ झोपड्या जळून खाक झाल्यात. ११२ रहिवासी नागरिक बेघर झालेत. नागरिकांच्या जीवनावश्यक वस्तूंसह रोजगारीचे साधनेही आगीत जळून खाक झाले. प्रशासनाकडून आगग्रस्तांना आर्थिक मदत करण्यात आली. मात्र, ही आग कुणीतरी समाजकंटकाने लावल्याचा आरोप रहिवाशांनी केला आहे. यासंदर्भात नगरसेवक प्रदीप दंदे यांनी शनिवारी पोलीस आयुक्त राजकुमार व्हटकर यांची भेट घेऊन बेघरांना न्याय देण्यासंदर्भात निवेदन दिले. याप्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. त्यांनी दिलेल्या माहितीवरून १ महिन्यांपूर्वी झोपडपट्टी अनिधिकृत असल्याचे महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी दाखवून दिले. एके दिवशी चारचाकी वाहनातून आलेल्या १५ ते २० युवकांनी जागा खाली करण्यासंदर्भात त्यांना धमकावले होते. त्यानंतर ३० डिसेंबरला झोपडपट्टीला आग लागली. दोन दिवसांपूर्वी काही अज्ञातांनी पुन्हा त्यांना पूर्ण झोपडपट्टी जाळण्यासंदर्भात धमकी दिल्याचे निवेदनात नमूद आहे. त्यामुळे यातील दोषींवर कठोर कारवाई करावी. तसेच झोपडपट्टीला पोलीस संरक्षण द्यावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. यावेळी सुधीर इंगळे, लीला चव्हाण, संतोष गवई, बेबी गवई, शरद इंगळे, मंगेश वानखडे, विनोद तायडे, भीमराव धंदर, किशोर डोंगरे, नर्मदा तायडे, सुखदेव इंगळे आदी उपस्थित होते.