मोफत कायदे व शासकीय योजनांचा लाभ घ्या - न्या. मुकुल गाडे
By ऑनलाइन लोकमत | Published: January 28, 2018 07:34 PM2018-01-28T19:34:48+5:302018-01-28T19:34:55+5:30
राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरणामार्फत या वर्षीपासून पहिल्यांदाच सर्व शासकीय कार्यालयांमार्फत गोरगरिबांसाठी राबविल्या जाणा-या योजनांची माहिती थेट गावपातळीवर देण्याचा उपक्रम राबविला जात आहे.
धारणी (अमरावती) : राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरणामार्फत या वर्षीपासून पहिल्यांदाच सर्व शासकीय कार्यालयांमार्फत गोरगरिबांसाठी राबविल्या जाणा-या योजनांची माहिती थेट गावपातळीवर देण्याचा उपक्रम राबविला जात आहे. याचा अमरावती जिल्ह्यातील पहिला बहुमान धारणी तालुक्याला मिळाला. तालुक्यातील शिरपूर येथील नागरिक याचे प्रथम मानकरी ठरले आहेत.
शिरपूर येथील जि. प. पूर्व माध्यमिक शाळेत आयोजित कायदे व शासकीय योजनांच्या मार्गदर्शन शिबिराचे आयोजन पार पडले. मोफत कायदेविषयक मार्गदर्शन व विविध शासकीय योजनांचा लाभ घ्या व याची माहिती परिसरात द्या, असे आवाहन धारणी तालुका विधी सेवा समितीचे अध्यक्ष तथा दिवाणी व फौजदारी न्यायाधीश मुकुल गाडे यांनी नागरिकांना याप्रसंगी अध्यक्ष स्थानाहून केले.
तालुका विधी सेवा समिती, वकील संघ आणि शिरपूर ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या शिबिरात प्रमुख अतिथी म्हणून वकील संघाचे अध्यक्ष अॅड. सत्यदेव गुप्ता, तहसीलदार संगमेश कोडे, ठाणेदार किशोर गवई, उपसरपंच सुनील जायसवाल, पोलीस पाटील अंजली जांबडे मंचावर उपस्थित होते. प्रास्ताविक अॅड. सत्यदेव गुप्ता यांनी केले. तालुका विधी सेवा समितीमार्फत दिल्या जाणा-या योजनांची माहिती न्या. एम.एस. गाडे, तहसील कार्यालयातील माहिती नायब तहसीलदार आदिनाथ गाजरे, रोजगारविषयक माहिती दीपक कांबळे, कृषीविषयक योजनांची माहिती एस.आर. बेराड, वनविभागातील योजनांची माहिती वनपाल एस.एस. पाचंगे, तर महिला व बाल विकास कार्यालयातील योजनांची माहिती संरक्षण अधिकारी सचिन आसोले यांनी दिली. यावेळी सर्व विभागांनी कार्यक्रमस्थळी स्टॉल लावले होते. याचा लाभ हजारो नागरिकांनी घेतला.