मनरेगाअंतर्गत कृषी विभागाच्या योजनांचा लाभ घ्यावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2021 04:10 AM2021-06-20T04:10:00+5:302021-06-20T04:10:00+5:30
अमरावती : मनरेगाअंतर्गत कृषी विभागातर्फे वैयक्तिक लाभाच्या अनेक योजना राबविल्या जातात. शेतकरी बांधवांनी त्याचा लाभ घेण्याचे आवाहन जिल्हा कृषी ...
अमरावती : मनरेगाअंतर्गत कृषी विभागातर्फे वैयक्तिक लाभाच्या अनेक योजना राबविल्या जातात. शेतकरी बांधवांनी त्याचा लाभ घेण्याचे आवाहन जिल्हा कृषी अधीक्षक अधिकारी विजय चवाळे यांनी केले आहे.
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत फळबाग लागवड, बांधावर वृक्षलागवड, फुलशेती, नाडेप कंपोस्ट, गांडुळ खत, विहीर पुनर्भरण या वैयक्तिक लाभाच्या योजना राबविण्यात येतात. फळबाग लागवडीसाठी संत्रा, मोसंबी, कागदी लिंबू, सीताफळ, आवळा, आंबा, पेरू, चिकू आदी तर बांधावर लागवडीसाठी साग, बांबू, शेवगा, कडूलिंब, सोनचाफा, बोर, सीताफळ, आवळा, आंबा आदींसाठी अनुदान देय आहे. फुलपीकांमध्ये निशिगंध, गुलाब व मोगरा फुलपिकांसाठी अनुदान देय आहे. नाडेप कंपोस्टसाठी, तसेच गांडुळ खत युनिटसाठी प्रत्येकी ११ हजार, तर विहीर पुनर्भरणासाठी १४ हजार रुपये अनुदान या योजनेंतर्गत देण्यात येते.
जॉबकार्डधारक अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, दारिद्र्यरेषेखालील लाभार्थी, भूसुधार योजनेचे लाभार्थी, इंदिरा आवास योजनेचे लाभार्थी, अत्यल्प व अल्प लाभार्थी भाग घेऊ शकतात. या योजनेचा लाभ घेण्यासाठी इच्छुकांनी आपल्या गावातील कृषी सहायक, मंडळ कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.