बेलोरा विमानतळाचे १२ वर्षांपासून ‘टेक- ऑफ’ रखडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 4, 2021 04:09 AM2021-07-04T04:09:34+5:302021-07-04T04:09:34+5:30
गणेश वासनिक (विमानतळाचा फाेटो घेणे) राजकीय अनास्था, निधीसाठी केवळ घोषणांचा पाऊस, धावपट्टीच्या टायरिंग डांबरीकरण लेअरसाठी २१ कोटी मिळेना अमरावती ...
गणेश वासनिक (विमानतळाचा फाेटो घेणे)
राजकीय अनास्था, निधीसाठी केवळ घोषणांचा पाऊस, धावपट्टीच्या टायरिंग डांबरीकरण लेअरसाठी २१ कोटी मिळेना
अमरावती : अमरावती जिल्ह्याच्या विकासात मैलाचा दगड ठरणाऱ्या बेलाेरा विमानतळाची काम अपूर्णच आहे. २००९ ते २०२१ या १२ वर्षाच्या कालावधीत येथून विमाने ‘टेक-ऑफ’ घेऊ शकली नाहीत. हल्ली धावपट्टीच्या तिसऱ्या डांबरीकरणाच्या टायरिंग लेअरसाठी २१ कोटींच्या निधीची गरज आहे. तर संरक्षण भिंतीची निर्मिती निधीअभावी रखडली आहे. राजकीय अनास्थेमुळे विमानतळाचा विकास होऊ शकला नाही, हे स्पष्ट होते.
बेलाेरा विमानतळाचा विस्तार व विकास करण्यासाठी डॉ. सुनील देशमुख पालकमंत्री २६ फेब्रुवारी २००९ रोजी शासन निर्णय निर्गमित झाला. बीओटी तत्त्वावर महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी यांची विशेष उद्देश कंपनी म्हणून नियुक्ती करण्यात आली. या प्रकल्पाची किंमत २७९.३१ कोटी मंजूर करण्यात आली. वळण मार्ग आणि भूसंपादनसाठी ६४.३३ कोटी मंजूर झाले. शासन निर्णयानुसार एमआयडीसीच्या अख्यत्यारीत तत्कालीन विमानतळाची ६४.८७ हेक्टर जमीन प्रशासकीय इमारत ३००० चौरस फूट, एटीटीएस टॉवर इमारत आदी एमएडीसीला विनामूल्य हस्तांतरित करण्यात आली. त्याअनुषंगाने विमानतळाचे विस्तारीकरण
व विकासासाठी या भागातील २८७ हेक्टर जमीन नव्याने अधिग्रहित करण्यात आली. त्याचप्रमाणे १८ हेक्टर जमीन अमरावती- यवतमाळ रस्त्याच्या स्थलांतरणासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाला हस्तांतरित करण्यात आली. त्यानंतर सन २०१४ मध्ये सध्या अस्तित्वातील विमानतळ, त्यावरील बांधकाम याव्यतिरिक्त संपादित केलेली जमीन, अशी एकूण ४११ हेक्टर जमीन एअरपोर्ट ॲथॉरिटीला ६० वर्षांच्या कालावधीसाठी भाडेपट्ट्याने नूतनीकरणाच्या तरतुदींसह हस्तांतरित करण्यात आली. विविध कराच्या सवलती देताना बडनेरा-यवतमाळ वळण रस्ता, विमानतळास जोडणारा चौपदरीकरण रस्ता, विद्युत वाहिन्यांची पुनर्बांधणी, पाणीपुरवठा या कामांसाठी ३४ कोटी रुपयांची मान्यता देण्यात आली. मात्र, प्रत्यक्षात सन २०१५ पर्यंत प्रत्यक्षात कोणतीही कामे झाली नव्हती. डॉ. सुनील देशमुख हे राज्य शासनाच्या सार्वजनिक उपक्रम समितीचे प्रमुख म्हणून नियुक्त झाले. त्यानंतर बेलोरा विमानतळ विकासासाठी २२ फेब्रुवारी २०१६ राेजी समितीचे सदस्य, एमएडीसीचे वरिष्ठ अधिकाऱ्यांची प्रत्यक्षात विमानतळावर बैठक झाली. तेव्हा ७५ कोटी रुपये विकासकामांसाठी प्रस्तावित करण्यात आले. त्यानंतर विमानतळाचा विकासाचा मार्ग सुकर झाला होता. मध्यंतरी उपमुख्यमंत्री अजित पवार हे अमरावती दौऱ्यावर त्यांनी बेलोरा विमानतळाच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही, असे जाहीर केले होते. मात्र, ही घोषणासुद्धा हवेत विरली.
-------------------
धावपट्टी डांबरीकरणाच्या प्रतीक्षेत
बेलोरा विमानतळावरून ७२ आसनी विमाने सुरू करण्यासाठी १३७२ ऐवजी २२५० मीटर एवढी धावपट्टी वाढविण्यात आली. धावपट्टीवर दोन डांबरीकरणाचे थर टाकण्यात आले. मात्र, तिसरा महत्त्वाचा भर अद्यापही टाकला नाही. त्याकरिता २१ कोटी निधींची गरज आहे. संरक्षण भिंतीचे काम रखडले असून, त्यासाठी अडीच कोटी निधीची गरज आहे. सदर कंत्राटदारांची ९ कोटींची देयके प्रलंबित असल्याची माहिती आहे.
-------------------
ही कामेही अर्धवटच
बेलाेरा विमानतळावर वीज, पाणीपुरवठा, टर्मिनल इमारत, एटीएस टॉवर, पार्किंग, संरक्षण भिंत, विश्रामगृह, बाह्य वळण रस्ता
----------------
खासदार, आमदारांनी लक्ष देणे गरजेचे
अमरावती जिल्ह्यात विकासासाठी विमानतळ अतिआवश्यक आहे. त्यामुळे महिला व बाल कल्याणमंत्री तथा अमरावतीच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर, सिंचन राज्यमंत्री तथा अकोल्याचे पालकमंत्री बच्चू कडू, खा. नवनीत राणा, आ. रवी राणा, सुलभा खाेडके, प्रताप अडसड, राजकुमार पटेल, बळवंत वानखडे, देवेंद्र भुयार, प्रवीण पोटे, किरण सरनाईक, रणजित पाटील यांनी लक्ष देणे काळाची गरज आहे.
--------------
कोट
सध्या बेलोरा विमानतळावर विकासकामांबाबत काही सांगता येणार नाही. कन्स्लटंटकडून सविस्तर माहिती घ्यावी लागेल. त्यानंतर बोलता येईल.
- मोहन खडगे, ओएसडी, एमएडीसी, मुंबई