इतवारा बाजाराने घेतला मोकळा श्वास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 26, 2017 11:41 PM2017-11-26T23:41:45+5:302017-11-26T23:41:55+5:30
शहरातील अतिवर्दळीचा इतवारा बाजार परिसराने रविवारी मोकळा श्वास घेतला. अतिक्रमणाच्या विळख्यात इतवारा बाजार मोकळा झाल्यामुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळाला.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : शहरातील अतिवर्दळीचा इतवारा बाजार परिसराने रविवारी मोकळा श्वास घेतला. अतिक्रमणाच्या विळख्यात इतवारा बाजार मोकळा झाल्यामुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळाला. कोतवाली पोलिसांच्या या कामगिरीचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.
इतवारा बाजारातील अतिक्रमणामुळे नेहमीच वाहतुक कोंडीची समस्या निर्माण होत होती. त्यातच रोड अपघात व पादचाºयांना तारेवरची कसरत करावी लागत होती. सोबतच महिलांची छेडखाणी, पॉकीटमारी, दुचाकी चोर सुध्दा संक्रीय होते. त्या अनुषंगाने कोतवालीचे ठाणेदार दिलीप पाटील यांनी रविवारी अतिक्रमण हटविण्याची धडक मोहीम राबवून सर्व परिसर अतिक्रमणाच्या विळख्यातून मुक्त केले. तेथे लागणाºया फळांची दुकाने, हातगाड्यांच्या अतिक्रमणांमुळे नागरिकांना रस्त्यावरून चालणेही कठीण झाले होते. अतिक्रमणधारकांनी दुकानासमोर लावलेल्या प्लास्टिक पन्न्यांमुळे या बाजारात काही दिसेनासे झाले होते. मात्र, पोलिसांनी रविवारी केलेल्या कारवाईमुळे रस्त्यावरील अतिक्रमण पूर्णपणे हटविण्यात आले आले आहे. आता मुख्य रस्त्यावरून आतील सर्व भाग थेट पाहता येऊ शकते. या अतिक्रमणामुळे पोलिसांच्या रात्रकालीन गस्तीत अडचण निर्माण होत होती. मात्र, आता रस्त्यावरूनच आतील भागाचा आढावा पोलिसांना घेता येऊ शकते.
इतवारा बाजारातील अतिक्रमणाचा नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत होता. पॉकीटमारी, मोबाईल चोर, दुचाकी चोर अतिक्रमणाच्या आड दडून बसण्याची शक्यता होती. त्यामुळे संपूर्ण अतिक्रमण हटविण्यात आले आहे.
- दिलीप पाटील, पोलीस निरीक्षक, कोतवाली ठाणे