साईबाबा ट्रस्टवर फौजदारी कारवाई करा
By admin | Published: March 27, 2015 12:00 AM2015-03-27T00:00:50+5:302015-03-27T00:00:50+5:30
स्थानिक साईनगरातील साईबाबा ट्रस्टच्या अधिपत्याखाली अनेक वर्षांपासून असलेल्या जुन्या बगिच्याला सार्वजनिक करण्यासाठी महापालिकेने ट्रस्टला नोटीस बजावली आहे.
अमरावती : स्थानिक साईनगरातील साईबाबा ट्रस्टच्या अधिपत्याखाली अनेक वर्षांपासून असलेल्या जुन्या बगिच्याला सार्वजनिक करण्यासाठी महापालिकेने ट्रस्टला नोटीस बजावली आहे. या नोटीसवर तीन दिवसांत अंमलबजावणी न केल्यास ट्रस्टच्या विरोधात फौजदारी कारवाईचा इशारा देण्यात आला. मात्र, ट्रस्टने कोणताच पुढाकार घेतलेला नाही. त्यामुळे याप्रकरणी पोलिसांनी फौजदारी कारवाई करावी, अशी मागणी ट्रस्टचे माजी सेवानिवृत्त व्यवस्थापक अविनाश ढगे यांनी केली आहे.
साईनगरयेथील साईबाबा ट्रस्टच्या विश्वस्तांनी बगिचा आणि सार्वजनिक वापराचे भूखंड तर हडपलेच. परंंतु या सार्वजनिक भूखंडावर वाणिज्य वापराचे उपक्रम वर्षानुवर्षे शासनाचा महसूल बुडविला आहे. भूखंड १२४ सुरेख बगिच्यासाठी आरक्षित आहे. परंतु ही जागा सार्वजनिक उपयोगाची असल्याचे तथ्य माहितीच्या अधिकारात पुढे आले आहे. या बगिचामधून ट्रस्टच्यावतीने नागरिकांकडून प्रवेश शुल्काशिवाय मनोरंजन शुल्क आकारले जातात. त्यामुळे महापालिकेने हा बगिचा सार्वजनिक घोषित करावा, अशी मागणी ढगे यांनी केली आहे.
याप्रकरणात महापालिकेच्या नगररचना विभागाचे सहायक संचालकांनी २ डिसेंबर २०१४ रोजी जिल्हाधिकाऱ्यांना पाठविलेल्या पत्रात सातुर्णा सर्वे क्र.३३ च्या अभिन्यासात सार्वजनिक जागेवरून ट्रस्टचे नाव हटवून महापालिकेच्या नावाचा फलक लावण्याची मागणी केली आहे.
याप्रकरणी साईबाबा ट्रस्टचे सेवानिवृत्त प्रबंधक अविनाश ढगे यांनी माहितीच्या अधिकारात प्राप्त केलेल्या माहितीनुसार, सदर बगिच्याची जागा वास्तवात सार्वजनिक उपयोगाची आहे. तरीही ट्रस्टने या बगिचातून उत्पन्न घेतले. याच आधारे महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने ट्रस्टला अतिक्रमणाची नोटीस जारी केली.