अतिक्रमितांविरुद्ध कठोर कारवाई करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2020 06:00 AM2020-02-13T06:00:00+5:302020-02-13T06:00:49+5:30
संत गाडगे महाराज मंदिर परिसरालगत ‘नो हॉकर्स झोन’संदर्भात त्वरित बोर्ड लावण्यात यावे, फुटपाथवर केलेले अतिक्रमण त्वरित काढावे, शहर बस स्टॉपलगत हॉकर्स अतिक्रमण करणार नाही, याची दक्षता घेण्याचे निर्देश महापालिका आयुक्त संजय निपाणे यांनी मंगळवारी दिले. गाडगेनगर ते पंचवटी रस्त्यालगत हॉकर्सना कचरापेटी वापरणे बंधनकारक करावे, अन्यथा कारवाई करावी. बियाणी चौकात डी-मार्टसमोरील हातगाड्यांसह दुचाकी वाहनधारकावर कठोर कारवाई करावी.
अमरावती : संत गाडगे महाराज मंदिर परिसरालगत ‘नो हॉकर्स झोन’संदर्भात त्वरित बोर्ड लावण्यात यावे, फुटपाथवर केलेले अतिक्रमण त्वरित काढावे, शहर बस स्टॉपलगत हॉकर्स अतिक्रमण करणार नाही, याची दक्षता घेण्याचे निर्देश महापालिका आयुक्त संजय निपाणे यांनी मंगळवारी दिले.
गाडगेनगर ते पंचवटी रस्त्यालगत हॉकर्सना कचरापेटी वापरणे बंधनकारक करावे, अन्यथा कारवाई करावी. बियाणी चौकात डी-मार्टसमोरील हातगाड्यांसह दुचाकी वाहनधारकावर कठोर कारवाई करावी. राजकमल चौकात उभे राहणारे सर्व ऑटो गल्लीत लावण्याबाबत पोलीस निरीक्षक, शहर वाहतूक यांना सुचित करावे. शहरातील सर्व सिग्नल सुरळीत असल्याची खातरजमा करा. श्याम चौक, जयस्तंभ चौक येथे ब्लिंकर्स लावा, असे आयुक्त म्हणाले.
महत्त्वाच्या ठिकाणी सौरदिवे लावले जाणार असल्याचे उपअभियंता (विद्युत) यांनी सांगितले. यासाठी तीन दिवसांत निविदा काढण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले. झोन कार्यालयात सन २०१६ पूर्वीचे जन्म-मृत्यू दाखले उपलब्ध करण्याची व्यवस्था आरोग्य अधिकारी व सिस्टिम मॅनेजर यांनी करावी, अशा सूचना आयुक्तांनी केल्यात.
निवारा बांधकामासाठी जागेचा अहवाल मागितला
महापालिका क्षेत्रात रात्रनिवारा बांधकामाकरिता शासन निधी उपलब्ध करून देत आहे. त्याकरिता जागा ही रेल्वे स्थानक, बस स्थानकापासून १-२ किलोमीटर अंतरावर असणे अनिवार्य आहे. त्याअनुषंगाने बेलपुरा येथील शाळेची जागा योग्य असल्याचे सहायक आयुक्तांनी सांगितले. याअनुषंगाने सहायक संचालक नगररचना, सहायक आयुक्त (मुख्यालय) तसेच संबंधित उपअभियंता यांनी स्थळ निरीक्षण करून तत्काळ अहवाल सादर करण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले.