सभापतिपदाची निवडणूक घ्या
By admin | Published: April 18, 2017 12:26 AM2017-04-18T00:26:31+5:302017-04-18T00:26:31+5:30
येथील कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सुनील वऱ्हाडे यांनी राजीनामा दिला व जिल्हा उपनिबंधकांनी २९ मार्चला तो मंजूर केला.
अमरावती बाजार समिती संचालकांची मागणी : अन्यथा न्यायालयात दाद मागू
अमरावती : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सुनील वऱ्हाडे यांनी राजीनामा दिला व जिल्हा उपनिबंधकांनी २९ मार्चला तो मंजूर केला. त्यामुळे रिक्त सभापतीपदाची निवडणूक घेण्यात यावी, अशी मागणी १४ संचालकांनी प्रभारी जिल्हाधिकारी खुशालसिंग परदेशी यांना सोमवारी निवेदनाद्वारे केली.
बाजार समितीे सभापती सुनील वऱ्हाडे यांनी २७ मार्चला पणन संचालकांकडे राजीनामा सादर केला. मात्र, मंजुरीचे अधिकार जिल्हा उपनिबंधकांकडे असल्याने त्यांनी तो २९ मार्चला मंजूर केला. दरम्यान बाजार समितीच्या तक्रारी सहकार मंत्र्यांकडे करण्यात आल्यात.
जोपर्यंत चौकशी होत नाही तोवर प्रशासकांची नियुक्ती करण्यात आल्याचे पत्र आ. रवी राणा यांनी दिले. महाराष्ट्र शेती उत्पन्नाच खरेदी-विक्री अधिनियम १९६३ चे कलम २५ अन्वये सभापती व उपसभापतींचे रिक्त पद भरण्याची तरतूद आहे. त्यामुळे चौकशी सुरू असतानाही सभापतीपदाची निवडणूक लावता येते. त्यामुळे येथील सभापतीपदाची निवडणूक घ्यावी, अन्यथा आम्ही न्यायालयात दाद मागू असे निवेदनात नमूद आहे.
यावेळी बाजार समितीचे संचालक नाना नागमोते, श्याम देशमुख, विकास इंगोले, प्रफुल्ल राऊत, प्रकाश काळबांडे, किरण महल्ले, अशोक दहिकर, प्रवीण भुगूल, किशोर चांगोले, उमेश घुरडे, सतीश अटल, रंगराव विचुकले, उषा वणवे, प्रांजली भालेराव उपस्थित होते.