६० लाखांचा फ्लॅट घेऊन दे, अन्यथा मोकळी हो!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2021 04:16 AM2021-08-19T04:16:50+5:302021-08-19T04:16:50+5:30
हुंड्यात दिलेल्या चारचाकीचे हप्ते भर सोने खरेदीसाठी २ लाख आण लग्नात काहीच न दिल्याची हाकाटी वडिलांच्या अंगावरही धावले फ्रेजरपुरा ...
हुंड्यात दिलेल्या चारचाकीचे हप्ते भर
सोने खरेदीसाठी २ लाख आण
लग्नात काहीच न दिल्याची हाकाटी
वडिलांच्या अंगावरही धावले
फ्रेजरपुरा पोलिसांत चौघांविरूद्ध गुन्हा
अमरावती: पत्नीच्या माहेरकडून लाख दोन लाख रुपयांची मागणी केल्याचे प्रकार नवे नाहीत. त्यापुढे जाऊन एका तरूणाने आपल्या पत्नीकडे चक्क ६० लाख रुपयांच्या फ्लॅटची मागणी केली. ती पुर्ण न केल्याने पत्नीला घराबाहेर काढल्याचा प्रकार येथील छांगाणी नगरात उघड झाला.
वरकरणी ही तक्रार हुंड्यासाठी छळ या सदरात मोडणारी असली, तरी पत्नीच्या माहेराकडून पतीच्या अपेक्षा आता कुठल्या प्रमाणापर्यंत वाढल्या आहेत, ते दर्शविणारी ठरली आहे. हुंड्यासाठी पती व सासरच्या मंडळीकडून छळ होत असल्याच्या जिल्हयात सरासरी तीन तक्रारी रोज नोंदविल्या जातात. बोटावर मोजण्याईतपत प्रकरणात समेट घडून येतो. तर उर्वरित प्रकरण काडीमोडापर्यंत जाऊन ठेपते.
तुझ्या वडिलांनी लग्नात काहीच दिले नाही, म्हणून वडिलांकडून नागपूर येथे ६० लाखांचा फ्लॅट घेऊन दे, तो व्यवहार पक्का झाल्यावरच तोंड दाखव, असे बजावत या विवाहितेला पतीसह अन्य तिघांनी घराबाहेर काढले. आम्हाला तुझ्यापेक्षा अधिक हुंडा देणारी मुलगी मिळाली असती. असे म्हणून १६ फेब्रुवारीपासून या छळाला सुरूवात झाली. पती एवढ्यावरच थांबला नाही. लग्नात घेऊन दिलेल्या चारचाकी वाहनाचे हप्ते वडिलांना दरमहा भरायला लाव. असेही त्याने बजावले. तुर्तास सोनेखरेदीसाठी दोन लाख रुपये माग, अशी मागणी केली.
माहेरी सोडले
पतीने पत्नीला २२ जुलै रोजी तिच्या माहेरी सोडून दिले. २५ जुलै रोजी पिडिताला सासरी सोडून देण्यासाठी तिचे आईवडील, मामा ही मंडळी छांगाणीनगरात पोहोचली. तेव्हा, फ्लॅटचे पक्के झाल्यावरच तोंड दाखव, म्हणून पतीने पिडिताला मारहाण केली. सोडचिठ्ठी देण्याची धमकी दिली. योगेश गोडाळे हा पिडिताच्या वडिलांच्या अंगावर धावून गेला. मध्यस्थी करण्यास धजावलेल्या पिडिताला चारही आरोपींनी घराबाहेर हाकलून दिले. समेटाची शक्यता दिसून न आल्याने त्या विवाहितेने १७ ऑगस्ट रोजी सायंकाळी फ्रेजरपुरा पोलीस ठाणे गाठले.
यांच्याविरूद्ध गुन्हे
विवाहितेच्या तक्रारीवरून पती अंकित गोडाळे (३१), एक महिला, प्रल्हादराव गोडाळे (५५, सर्व रा. छांगाणीनगर) व योगेश गोडाळे (४०, रा. आसलगाव, जि. बुलडाणा) यांच्याविरूद्ध कौटुंबिक हिंसाचाराचे गुन्हे दाखल करण्यात आले.