जंगल संरक्षणार्थ शस्त्रे बाहेर काढा!, एपीसीसीएफचे आदेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2018 05:50 PM2018-06-18T17:50:01+5:302018-06-18T17:50:01+5:30
राज्यात वनक्षेत्रांमध्ये शिकाºयांना रोकठोक जबाब देण्यासाठी वनाधिका-यांना शस्त्रे, दारूगोळा दिलेला असून, ती शस्त्रे कपाटबंद असल्याबाबत राज्याचे अप्पर प्रधान मुख्यवनसंरक्षक आर. एस. यादव यांनी नाराजी व्यक्त केली आहे
गणेश वासनिक
अमरावती : राज्यात वनक्षेत्रांमध्ये शिकाºयांना रोकठोक जबाब देण्यासाठी वनाधिका-यांना शस्त्रे, दारूगोळा दिलेला असून, ती शस्त्रे कपाटबंद असल्याबाबत राज्याचे अप्पर प्रधान मुख्यवनसंरक्षक आर. एस. यादव यांनी नाराजी व्यक्त केली आहे. वनविभागात आय.एफ.एस. अधिकाºयांना रिव्हॉल्व्हरचे काम काय, असा प्रश्न यादव यांनी पत्राद्वारे उपस्थित केला आहे.
अनेक वर्षांपासून वनक्षेत्रात व्याघ्र प्रकल्पात वाघांच्या शिकारी अतिक्रमण आणि सागवान तस्करांनी रान माजविले आहे. शस्त्रास्त्र असलेले शिकारी नेहमीच वनाधिका-यांवर हावी होत असल्याने वनविभागातील वनरक्षकांना टप्प्या-टप्प्याने एसएलआर रायफल आणि संवेदनशील क्षेत्रात काम करणाºया वनपालांना पीएसआयपदांच्या धर्तीवर रिव्हॉल्व्हर दिली आहे. प्रादेशिक आणि वन्यजीव विभागातील आरएफओंना सरसकट ९ एमएम रिव्हॉल्व्हर देण्यात आली आहे. मात्र, यातील बहुतांश शस्त्र हे गरज नसताना आणि जंगल संरक्षणात त्याचा कोणताही फायदा नसताना उपवनसंरक्षक आणि सहायक वनसंरक्षक वर्ग- १ च्या वनाधिका-यांना वाटप केले आहे. ही पदे जिल्हा किंवा तालुका पातळीवरचे असल्याने त्यांना जंगल संरक्षणाच्या नावाखाली रिव्हॉल्व्हर देण्यात आली. आयएफएस अधिका-यांनी १०५ च्यावर रिव्हॉल्व्हर स्वत:कडे अडवून ठेवल्या. मात्र, या सर्व रिव्हॉल्व्हर काढून वनपालांना देण्याचे धाडस अप्पर प्रधान मुख्यवनसंरक्षक (संरक्षण) करावे, अशी मागणी होत आहे.
सरसकट रिव्हॉल्व्हर का नाही?
राज्यात वनपालांची संख्या तीन हजार असून, १४०० वनपाल प्रादेशिक व वन्यजीव विभागात वर्तुळ अधिकारी म्हणून कार्य करतात. अशावेळी पीएसआय या समकक्ष पदानुसार त्यांना सरसकट जंगल संरक्षणाकरिता रिव्हॉल्व्हर, तर वनरक्षकांना एसएलआर रायफल देणे गरजेचे आहे. मात्र, अतिसंवेदनशील भागात कर्तव्यावर असलेल्या वनपालांना रिव्हॉल्व्हर दिलेले आहेत. व्याघ्र प्रकल्पात अशी शस्त्रे अद्यापही देण्यात आलेली नाही.
केवळ ७२० रिव्हॉल्व्हर
राज्यातील वनविभागाचा डोलारा मोठा असून, वनपाल, वनक्षेत्रपाल यांना आतापर्यंत ७२० एवढ्याच रिव्हॉल्व्हरचा पुरवठा करण्यात आला. यातील १०५ रिव्हॉल्व्हर आयएफएस लॉबीने स्वत:जवळ ठेवल्या आहेत. या रिव्हॉल्व्हर वनपालांना दिल्यास जंगल संरक्षणाकरिता त्याचा उपयोग होईल. कारण आयएफएस अधिका-यांची शस्त्रे ही त्यांच्या बंगल्याच्या कपाटात धूळखात पडली आहे.
वर्दी नसणा-यांना शस्त्र कशासाठी?
वनविभागात क्षेत्रीय अधिका-यांना वर्दी आहे. वर्ग १ च्या अधिकाºयांना वर्दी देण्यात आली नाही. जंगल संरक्षणार्थ महत्त्वाची भूमिका क्षेत्रीय वनाधिकारी बजावतात. त्यांना शस्त्रपुरवठा करणे शासनाचे कर्तव्य आहे. मात्र, दैनंदिन व्यवहारात जंगल संरक्षणात थेट सहभाग नसणाºया आणि वर्दी नसणा-या आयएफएस वनाधिकाºयांना रिव्हॉल्व्हर कशाकरिता दिल्यात? हा संशोधनाचा विषय आहे. मात्र, अप्पर प्रधान मुख्यवनसंरक्षक (संरक्षण) आर. एस. यादव यांनी जंगल संरक्षणार्थ शस्त्र बाहेर काढा धूळखात ठेवू नये, अशी तंबी राज्यातील सर्व मुख्यवनसंरक्षकांना दिली आहे.