खासगीतील शिक्षक झेडपीत घ्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 3, 2018 10:03 PM2018-09-03T22:03:09+5:302018-09-03T22:03:49+5:30
खासगी अनुदानित प्राथमिक माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांतील अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांना प्रतिनियुक्तीने जिल्हा परिषद शाळांमध्ये पदस्थापना द्याव्यात, तसेच त्यांना हजरही करून घेण्याचे आदेश ग्रामविकास विभागाने जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाला दिले आहेत. त्यामुळे खासगी अनुदानित शाळांतील अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजनाचा प्रश्न सुटणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : खासगी अनुदानित प्राथमिक माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांतील अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांना प्रतिनियुक्तीने जिल्हा परिषद शाळांमध्ये पदस्थापना द्याव्यात, तसेच त्यांना हजरही करून घेण्याचे आदेश ग्रामविकास विभागाने जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाला दिले आहेत. त्यामुळे खासगी अनुदानित शाळांतील अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजनाचा प्रश्न सुटणार आहे.
जिल्हा परिषद प्रशासनास डिसेंबर २०१७ मध्ये खासगी अनुदानित अतिरिक्त शिक्षकांना झेडपीमध्ये हजर करून घेणे आणि नियुक्ती देण्याबाबत आदेश देण्यात आले होते. परंतु झेडपीने या आदेशाची अंमलबजावणी केलेली नाही. त्यामुळे गुरुवार ३१ आॅगस्ट रोजी पुन्हा अशा शिक्षकांना रुजू करून घेण्याचे आदेश ग्रामविकास विभागाने काढले आहेत. शिक्षण विभागाने जिल्हानिहाय जिल्हा परिषदेला खासगी शाळांतील अतिरिक्त शिक्षकांची यादी पाठवलेली आहे. त्यांची ज्येष्ठता यादी बनवावी त्यापैकी किती शिक्षकांची जिल्हा परिषद रिक्त जागांवर आवश्यकता आहे. हे निश्चित करावे आणि ज्येष्ठतम शिक्षकांना सामावून घ्यावे. शिक्षकांची यादी शालेय शिक्षण विभागाला पाठवावी. समायोजित शिक्षकांना तत्काळ रुजू होण्यासंबंधी सीईओ स्तरावरून आदेशित करण्याबाबत कळवण्यात आले आहे. शिक्षकांना पदस्थापना देताना अवघड क्षेत्रातील गरोदर महिला व स्तनदा माता तसेच संवर्ग १ मध्ये मोडणारे जे शिक्षक रॅण्डमायझेशन राऊंडमध्ये अवघड क्षेत्रात गेले आहेत. अशा शिक्षकांना त्या ठिकाणी पदस्थापना देऊन त्यांच्या जागी खासगी अनुदानित शाळांतील शिक्षकांना पदस्थापना देण्याचे सूचित करण्यात आले आहे.
प्राथमिक शिक्षक समितीचा विरोध
अनेक वर्षांपासून आम्ही जिल्हा परिषद, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळातील प्रत्येक तुकडीस स्वतंत्र शिक्षक, शाळांसाठी विषयानुरूप आवश्यक शिक्षक, स्वतंत्र मुख्याध्यापक या माध्यमातून निकष ठरवून सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळात जे शिक्षक अतिरिक्त ठरत आहे, त्यांना प्रथम समायोजित करावे, अशी मागणी करीत खासगी अनुदानित शिक्षकांना झेडपी शाळांत समायोजन करण्यास आमचा विरोध असल्याचे प्राथमिक शिक्षक समितीचे राज्याध्यक्ष उदय शिंदे राज्य सरचिटणीस, विजय कोंबे, राजेश सावरकर यांनी सांगितले.
खासगी अनुदानित आदी शाळांतील अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांना प्रतिनियुक्तीने जिल्हा परिषद शाळांमध्ये पदस्थापना द्याव्यात, तसेच त्यांना हजर करून घेण्याचे आदेशही ग्रामविकास विभागाने शिक्षण विभागाला दिले आहेत. योग्य अंमलबजावणी केली जाईल.
- आर.डी. तुरणकर,
शिक्षणाधिकारी प्राथमिक