मिठाई घेताय? सावधान !
By admin | Published: October 4, 2016 12:10 AM2016-10-04T00:10:59+5:302016-10-04T00:10:59+5:30
अळीयुक्त कचोरी विकणाऱ्या रघुवीरच्या मिठाईत, खव्यात नेमके असते तरी काय, हा सामान्यांच्या आरोग्याशी जुळलेला अत्यंत गंभीर प्रश्न आता ऐरणीवर आला आहे.
एफडीए 'रघुवीर'मय : खव्यात नेमके असते तरी काय ?
अमरावती : अळीयुक्त कचोरी विकणाऱ्या रघुवीरच्या मिठाईत, खव्यात नेमके असते तरी काय, हा सामान्यांच्या आरोग्याशी जुळलेला अत्यंत गंभीर प्रश्न आता ऐरणीवर आला आहे.
नाश्त्याप्रमाणेच रघुवीरच्या मिठाईवरही लोकांनी विश्वास ठेवला होता. घरातील कुठल्याही शुभप्रसंगी रघुवीरची मिठाई बरेच जण न्यायचे. परंतु जिल्हाभरात दुधाचा आश्चर्यकारक तुटवडा असतानाही रघुवीरला असलेली दुधाची मुबलक उपलब्धी आणि त्यातून मागणीनुसार विक्रीसाठी तयार केली जाणारी मिठाई, या बाबी तज्ज्ञांच्याही भुवया उंचावणाऱ्या ठरल्या आहेत. तज्ज्ञांच्या मते जिल्ह्यातील दूध उत्पादनाच्या भरवशावर रघुवीरची मिठाई तयार होणे अशक्य आहे. ग्रामीण भागातून येणाऱ्या दुधाची गुणवत्ता बघता ते मिठाई निर्मितीसाठी अक्षम आहे. तज्ज्ञ मंडळींनी व्यक्त केलेल्या या गंभीर मुद्यावर 'लोकमत'ने यापूर्वीही एफडीचे लक्ष वेधले होते. एफडीएने सामान्यांच्या पोटात जाणाऱ्या या मिठाईबाबत संवेदनशील आणि कर्तव्यदक्ष भूमिका निभावली नाही. एफडीएने 'रॅन्डम सॅम्पल्स' घेणे अपेक्षित आहे. हे सॅम्पल्स अचानकपणे वारंवार घेतले तरच गुणवत्तेवर नियंत्रण राहू शकते. एफडीए अधिकाऱ्यांची नियुक्ती याच कार्यासाठी करण्यात आली आहे. सामान्य नागरिक भरत असलेल्या कराच्या पैशातून एफडीएच्या अधिकाऱ्यांचे वेतन अदा केले जाते. सामान्यांच्या आरोग्याला सुरक्षितता पुरविली जावी, हा त्यामागचा सरकारचा मूळ हेतू. परंतु सामान्यांच्या पोटात जाणारे दोषपूर्ण अन्न रोखण्याऐवजी नियमबाह्य अन्न विकणाऱ्यांनाच अभय देण्यासाठी एफडीए अधिकारी कार्यमग्न आहेत.
लोक झाले सतर्क
रघुवीरतर्फे केला जाणारा दर्जा आणि गुणवत्तेचा दावा कसा फोल आहे, हे कचोरीतील अळीतून सिद्ध झालेच आहे. अधिकाऱ्यांसमोर रघुवीरने पेश केलेली काजुची प्लेट 'लोकमत'ने लोकदरबारात मांडल्यानंतर त्यांच्या व्यवसायाची पद्धतीही आता अमरावतीकरांना उत्तमरीत्या अवगत झाली आहे. पर्याय नसल्यामुळे रघुवीरला महत्त्व देणारी मंडळी आता कमालिची सतर्क झाली आहे. लोकमत कार्यालयात येऊन अनेकांनी त्यांना रघुवीरमध्ये आलेले आक्षेपार्ह अनुभव कथन केलेत. असे अनुभव सांगणाऱ्यांमध्ये जसा सामान्यांचा समावेश आहे तसाच उच्चशिक्षित आणि प्रतिष्ठितांचाही त्यात समावेश आहे. काही डॉक्टर्स मंडळींनीही 'लोकमत'जवळ धक्कादायक अनुभव आणि निरीक्षणे नोंदविली. झुरळ, फकडी, दगड आढल्याचेही सांगितले. परंतु त्यांचा आवाज दाबण्यात आला होता. 'लोकमत'ने मुद्दा लोकदरबारात मांडल्यामुळे सामान्यांना व्यासपीठ मिळाल्याची भावना अमरावतीकरांनी व्यक्त केली. 'लोकमत'च्या अमरावती कार्यालयात पत्र पाठवून पाठपुराव्याबाबत अभिनंदन केले.