सायनहून टकलूने केले गुजरातेत पलायन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 9, 2021 04:13 AM2021-05-09T04:13:27+5:302021-05-09T04:13:27+5:30
अमरावती : राजापेठ ठाण्याच्या हद्दीतील चार वर्षीय मुलाच्या अपहरण प्रकरणाचा गुजरातहून ताब्यात घेतलेला मास्टर माईंड इसार शेख ऊर्फ टकलू ...
अमरावती : राजापेठ ठाण्याच्या हद्दीतील चार वर्षीय मुलाच्या अपहरण प्रकरणाचा गुजरातहून ताब्यात घेतलेला मास्टर माईंड इसार शेख ऊर्फ टकलू व अज्जू अजीज यांनी अहमदनगरहून सायन (मुंबई) व तेथून वापी (गुजरात) असे पलायन केले. या दोघांच्या पोलीस कोठडीदरम्यान चौकशीत ही माहिती पुढे आली. त्यांची पोलीस कोठडी शुक्रवारी संपुष्टात कारागृहात रवानगी करण्यात आली आहे.
जेव्हा हिना ऊर्फ सपना अनिकेत देशपांडे व तिच्या एका साथीदाराने मुलाचे अपहरण केले, तेव्हा टकलू हा नागपूर मार्गावरील वेलकम पॉईंटजवळ कार घेऊन उपस्थित होता. त्याच्यासोबत आसिफ व वसीमसुद्धा होता. अज्जू व टकलूला गुजरात पोलिसांकडून ताब्यात घेतल्यानंतर त्याची कोरोना चाचणी करण्यात आली. टकलृू पॉझिटिव्ह निघाल्याने त्याच्यावर उपचार करण्यात आले. यानंतर राजापेठ पोलिसांनी सात दिवसांची पोलीस कोठडी मागितली. चौकशी दरम्यान या प्रकरणाशी संबंधित धागेदोरे पोलिसांच्या हाती लागल्याची माहिती राजापेठचे पोलीस निरीक्षक मनीष ठाकरे यांनी दिली.
अपहरण प्रकरणात आतापर्यंत १० आरोपींना अटक करण्यात आली व एका अल्पवयीन आरोपीला ताब्यात घेतले. त्याची बाल सुधारगृहातून सुटका झाली. वसीम नामक अन्य एका आरोपीला अद्याप अटक झालेला नाही. त्याचा शोध तपास पथक घेत आहेत. त्याला लवकरच अटक केली जाईल, असे राजापेठ पोलिसांनी सांगितले.
बॉक्स:
धारावीत टकलूचा शोध
पीएसआय काठेवाडे व इतर तपास पथकांनी टकलू व त्याच्या साथीदारांचा मुंबईतील धारावी तसेच वांद्रे येथील झोपडपट्टीत शोध घेतला. मात्र, टकलू वापीला पळाला. तेथील एका बिल्डरच्या अपहरण प्रकरणात गुजरात पोलिसांनी एका टोळीला अटक केली. त्यात टकलू व अज्जूसुद्धा जेरबंद झाले. राजापेठ पोलिसांनी तेथून त्यांना ताब्यात घेतले.
बॉक्स
पोलिसांच्या जलद कारवाईचे टकलूला आश्चर्य
मुलाच्या अपहरण प्रकरणात एवढ्या त्वरेने पोलीस आपल्यापर्यंत पोहोचले, याबाबत टकलूने आश्चर्य व्यक्त केल्याचे अज्जूने पोलीस कोठडीतील चौकशीत सांगितले. अपहरण प्रकरणात हिना शेखसोबत टकलूची प्रमुख भूमिका होती. त्याच्याविरुद्ध अहमदनगर येथे अनेक गुन्हे दाखल आहेत.