तळेगाव येथील तलाठी निवास बेवारस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2021 04:09 AM2021-06-20T04:09:58+5:302021-06-20T04:09:58+5:30
तळेगाव दशासर : येथील आठ ते नऊ वर्षांआधी बनलेले तलाठी कार्यालय व निवासस्थानाची इमारत बेवारस स्थितीत पडली आहे. येथील ...
तळेगाव दशासर : येथील आठ ते नऊ वर्षांआधी बनलेले तलाठी कार्यालय व निवासस्थानाची इमारत बेवारस स्थितीत पडली आहे. येथील जिल्हा परिषद कनिष्ठ महाविद्यालयाच्या मागे प्रभाग क्र. तीन मध्ये आठ ते नऊ वर्षांपूर्वी शासनाने लाखो रुपयांच्या खर्च करून तलाठी कार्यालय व निवासस्थानाची इमारत निर्माण केली होती.
सदर इमारतीचे सहा वर्षांपूर्वीच बांधकाम पूर्ण झाल्याची माहिती आहे. परंतु, या तलाठी कार्यालय व निवास स्थानाबाबत संबंधितांजवळ कोणत्याही प्रकारचे माहिती नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. सदर इमारत बी अँड सी चांदूर रेल्वे यांनी बनविली असून, त्यांनाही याबद्दल माहिती नसल्याचे सांगण्यात येत आहे. याबाबत सार्वजिनक बांधकाम विभागाला विचारले असता, त्यांच्या माहितीनुसार ते काम अर्धवट आहे व काही लोक म्हणतात की, हस्तांतरण होणे बाकी आहे.
आठ - नऊ वर्षांपूर्वी लाखो रुपये खर्च करून उभारलेले तलाठी कार्यालय व निवासस्थानाच्या इमारतीचा काहीही उद्देश नाही. शासन- प्रशासनाने लाखो रुपये खर्च करून बेवारस ठेवण्याकरिता हा खर्च केला काय, हा प्रश्न काही सुजाण नागरिक करीत आहे.
आज येथील लाखो रुपये खर्च करून उभारलेल्या या इमारतीच्या खिडकीच्या काचा फुटलेल्या आहेत. दरवाजे, फ्लोरिंग, वाल कंपाउंड सोबतच रंगरंगोटी पूर्ण खराब झालेले असून, आजूबाजूंच्या लोकांसाठी ही इमारत साधन बनले आहे.