तळेगावच्या शतकोत्तर शंकरपटावर सावट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2018 10:48 PM2018-01-13T22:48:39+5:302018-01-13T22:50:12+5:30
महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेल्या धामणगाव तालुक्यातील तळेगाव दशासर येथील शेकडो वर्षांची परंपरा असलेल्या शंकरपटावर सर्वोच्च न्यायालयाच्या बंदीमुळे यंदा सावट उभे राहिले आहे.
आॅनलाईन लोकमत
धामणगाव रेल्वे / तळेगाव दशासर : महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेल्या धामणगाव तालुक्यातील तळेगाव दशासर येथील शेकडो वर्षांची परंपरा असलेल्या शंकरपटावर सर्वोच्च न्यायालयाच्या बंदीमुळे यंदा सावट उभे राहिले आहे. विशेष म्हणजे यात सहभागी होणाऱ्या ३०० बैलजोड्या शेतकऱ्यांनी नांगरणीच्या कामाला लावल्या आहेत़
राज्यातील सामाजिक संस्थेने सर्वोच्च न्यायालयात गत सहा महिन्यांपूर्वी याचिका दाखल केली होती़ त्यावर निर्णय देताना सर्वोच्च न्यायालयाने राज्यातील शंकरपटावर बंदी घातली. स्वातंत्र्यपूर्व काळात नानासाहेब देशमुख यांनी तळेगावात शंकरपटाला सुरुवात केली़ त्यानंतर बापूसाहेब देशमुख व आता कृषक सुधार मंडळाचे अध्यक्ष रावसाहेब देशमुख त्यांचा वारसा टिकवून ठेवला.
या पटासाठी शेतकरी खास बैल तयार करीत होते. शंकरपटात धावणाऱ्या बैलांना राजा-सर्जा, शेरू-विरू, राजा-रॉकेट, शेरा-बादल, अशी नावे दिली जायची. घरातही पटशौकीन ही नावे आपल्या बैलांना वापरत असत. या बंदीमुळे पटशौकीनांत निरूत्साह दिसत आहे़
महिलांमध्ये नाराजी
पुरुषांप्रमाणेच महिलांचाही या शंकरपटात सहभागअसायचा. महिला राखीव पटात जोड्या जुंपणे, हाकणे, संचालन, घड्याळाची नोंद, जोड्यांची नोंदणी, निकाल, बक्षीस वितरण व स्वयंसेवक या सगळ्या भूमिका महिलाच पार पाडत असत़ देशातील हा अभिनव उपक्रम तळेगावातच राबविला जायचा. त्यामुळेच देशविदेशातील इलेक्ट्रॉनिक मीडिया या शंकरपटाची दखल घेत होते.
तीन दाणी शंकरपट
नानासाहेब देशमुख व त्यांच्या सहकाऱ्यांनी गावाच्या उत्तरेस गायरानमध्ये शंकरपट भरविण्यास सुरूवात केली़ त्यावेळी दो-दाणी एकदिवसीय शंकरपट होता़ दो-दाणी म्हणजे दोन दाणीवरून दोन बैलजोड्या एकाचवेळी सोडणे यातील जी जोडी कमी वेळेत अंतर पार करेल तिला बक्षीस, असे स्वरूप होते़ पुढे पटातील सहभागी जोड्यांची संख्या लक्षात घेता यात तीन गट पाडण्यात आले होते़ त्याला तीन दाणी म्हणतात.
शौकीनांत निरुत्साह
सर्वोच्च न्यायालयाने शंकरपटावर बंदी घातल्यामुळे या परिसरावरील ग्रामीण भागातील अर्थकारणावर मोठा परिणाम दिसून आला आहे़ शंकरपटावर हाकण्यात येणारे बैल आता नांगर व बंडीला जुंपावे लागत आहे़ गतवर्षी केंद्र सराकरने शंकरपटाला मंजुरी प्रधान केली होती़ त्यामुळे पट शौकीनांमध्ये उत्साह दिसत होता़ ‘पेटा’ ही संघटना न्यायालयात गेली आहे.