तळेगावात वादळी वाऱ्यासह पाऊस, अनेक झाडे कोसळली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2021 04:11 AM2021-05-30T04:11:58+5:302021-05-30T04:11:58+5:30
तळेगाव दशासर : येथे शनिवारी दुपारी तीन ते चार वाजता दरम्यान आलेल्या सोसाट्याच्या वाऱ्यासह अर्धा तास पाऊस झाल्याने नागरिकांची ...
तळेगाव दशासर : येथे शनिवारी दुपारी तीन ते चार वाजता दरम्यान आलेल्या सोसाट्याच्या वाऱ्यासह अर्धा तास पाऊस झाल्याने नागरिकांची तारांबळ उडाली.
आठवडी बाजारातील विजेचे खांब जमीनदोस्त झाल्याने वीजपुरवठा पूर्णत: खंडित झाला. गावातील प्रभाग क्र. ४ येथील ज्ञानेश्वर चन्ने यांच्या घरावर पिंपळाचे मोठे झाड पडल्याने घरातील टीव्ही, पंखा, कुलर, कपाट व घराचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. सदर पिंपळाचे झाड मोठे असल्याने आजूबाजूच्या घरांना तडे पडल्याचे वृत्त आहे.
पाण्याच्या टाकीजवळील ५० वर्षे जुने वडाचे झाड वादळी वाऱ्याने जमिनीतून पूर्ण पणे उपटून निघाल्याने आजूबाजूच्या घरावर कोसळल्याने महादेव येरणे, गोपाळ येरणे, विठ्ठल हजारे यांच्या घराचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.
वकील अहमद अब्दुल समंत, रमेश खंडारे यांचे घरावरील टिनपत्रे उडाली. पंकज खोब्रागडे यांचे पोल्ट्री फॉर्मचे शेड जमीनदोस्त झाले. अंबिका जिनिंग येथील कापूस सेक्शन पाईप तसेच खोलीवरील टिनपत्रे उडाल्याने यांचेही नुकसान झाल्याची माहिती आहे. यावेळी तलाठी डकरे, सरपंच मीनाक्षी ठाकरे, मंडळ अधिकारी बमनोटे, जिल्हा परिषद सदस्य अनिता मेश्राम, पंचायत समिती सदस्य नरेंद्र रामावत, उपसरपंच रमाकांत इंगोले यांनी घटनास्थळाला भेट देऊन नुकसानग्रस्त घरांची पाहणी केली.