तामिळनाडूचा राज्यपालांनी केली अमरावती जिल्ह्यातील वज्झरच्या अनाथ दिव्यांगाची विचारपूस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 8, 2020 06:46 PM2020-04-08T18:46:54+5:302020-04-08T18:50:34+5:30
बुधवारी सकाळी नऊ वाजता मोबाइल खणखणतो. शंकरबाबा आप कैसे हो ...बच्चे कैसे है? मै आपकी क्या मदत कर सकता हू? असेही विचारले जाते. कुशलक्षेम कळविल्यानंतर पैसे किती पाठवायचे? अशीही पलीकडून विचारणा होते. पैसे नकोत; त्याऐवजी किराणा पाठवा, असे शंकरबाबा सांगतात.
नरेंद्र जावरे
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : बुधवारी सकाळी नऊ वाजता मोबाइल खणखणतो. शंकरबाबा आप कैसे हो ...बच्चे कैसे है? अशी आपुलकीची सर्व विचारणा होते. मै आपकी क्या मदत कर सकता हू? असेही विचारले जाते. कुशलक्षेम कळविल्यानंतर पैसे किती पाठवायचे? अशीही पलीकडून विचारणा होते. पैसे नकोत; त्याऐवजी किराणा पाठवा, असे शंकरबाबा सांगतात. तात्काळ किराणा दुकानदाराचा बँक अकाऊंट नंबर घेऊन ५१ हजार रुपये पाठविले जातात.
मागील पंधरा वर्षांच्या मैत्रीचा उजळा देत कोरोना संकटात शंकरबाबांची आठवण करणारे हे आहेत तामिळनाडूचे राज्यपाल बनवारीलाल पुरोहित. मदतीपेक्षा आपुलकीने विचारल्यानेच वज्झरचे अनाथालय भारावून गेले आहे. राज्यपाल बनवारीलाल पुरोहित आणि अनाथांचे नाथ शंकरबाबा पापळकर यांची मैत्री १५-२० वर्षांपेक्षा अधिक जुनी आहे. नागपूरचे खासदार होण्यापूर्वी पुरोहित यांनी स्व. अंबादासपंत मतिमंद अनाथ बालगृहाला अनेकदा भेटी दिल्या आणि मदतही केली आहे.
किराणा व्यावसायिकाच्या खात्यात रक्कम
परतवाडा येथील एका किराणा दुकानदाराचा बँकेचा अकाऊंट नंबर समाजसेवक शंकरबाबा यांनी राज्यपालांच्या स्वीय सहायकाकडे पाठवला. त्यावर ५१ हजार रुपये तात्काळ खात्यात जमा करण्यात आले. शंकरबाबांच्या अनाथ, अपंग, बेवारस मुलांसाठी परतवाडा येथील त्या दुकानातून किराणा पाठविला गेला.
जिल्हाधिकाऱ्यांना आदेश
राज्यपाल बनवारीलाल पुरोहित यांनी समाजसेवक शंकरबाबा पापळकर यांच्याशी संवाद साधल्यानंतर तत्काळ जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनाही संस्थेकडे लक्ष देण्याचे आदेश दिले.
तामिळनाडूचे राज्यपाल बनवारीलाल पुरोहित यांच्याशी जुनी मैत्री आहे. अधून-मधून ते विचारणा करीत असतात. त्यांनी बुधवारी सकाळी कॉल करून सर्वांची विचारपूस केली आणि स्वत: आग्रह करीत ५१ हजार रुपयांचा किराणा पाठविला.
- शंकरबाबा पापळकर, ज्येष्ठ समाजसेवक