एका ठिकाणी टँकर, १० गावांत विहिर अधिग्रहण; यंदा मार्चपासून टंचाईच्या झळा   

By जितेंद्र दखने | Published: March 15, 2023 06:52 PM2023-03-15T18:52:57+5:302023-03-15T18:57:06+5:30

ग्रामीण भागातील चित्र; मे महिन्यातील परिस्थिती अधिक बिकट होण्याची शक्यता

Tanker at one place, acquisition of wells in 10 villages, water shortage in Melghat since March this year | एका ठिकाणी टँकर, १० गावांत विहिर अधिग्रहण; यंदा मार्चपासून टंचाईच्या झळा   

प्रातिनिधिक फोटो

googlenewsNext

अमरावती : यंदा अपेक्षेप्रमाणे मार्च महिन्यापासूनच ग्रामीण भागात पाणीटंचाईच्या झळा सोसाव्या लागत असून, मेळघाटातील चिखलदरा तालुक्यातील आकी गावाला टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे. याशिवाय चार तालुक्यांतील दहा गावांमध्ये खासगी विहिरींचे अधिग्रहण करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे एप्रिल व त्यानंतरच्या मे महिन्यातील परिस्थिती अधिक बिकट होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

यंदाचा पाणी टंचाई कृती आराखडा सुमारे १२ कोटी ४४ लाख रुपयांचा करण्यात आला आहे. यामध्ये अनेक योजना प्रस्तावित करण्यात आल्या आहेत. यंदा पावसाळा जोरदार झाला असला तरी पाण्याच्या साठवणुकीत प्रशासकीय यंत्रणा कमी पडते, असे दिसून येते. दरवर्षीप्रमाणे यंदासुद्धा चिखलदरा तालुक्यात पाणीटंचाईची झळ सहन करावी लागणार आहे. जलजीवन मिशनअंतर्गत कोट्यवधी रुपयांची कामे केली जात असल्याचे सांगितले जात असले तरी टंचाईची भीषणता पाहता यंत्रणेकडून केला जात असलेल्या उपाययोजना केव्हा फायदेशीर ठरणार, हा खरा प्रश्न आहे.

चिखलदरा तालुक्यातील १५ गावांना यंदा टँकरने पाणीपुरवठा करण्याचे प्रस्तावित करण्यात आले आहे. त्यानुसार आजघडीला आकी या गावाला टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. याशिवाय नांदगाव खंडेश्वर, अमरावती, तिवसा, चिखलदरा या चार तालुक्यांमधील दहा गावांतील नागरिकांची तहान भागविण्यासाठी प्रशासनाकडून त्या गावांतील खासगी विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे. येत्या काही दिवसांत ही संख्या वाढण्याची दाट शक्यताही वर्तविली जात आहे.

या आहेत उपाययोजना

नवीन विंधन विहिरी, नवीन हातपंप, खासगी विहिरींचे अधिग्रहण, नळयोजनाची विशेष दुरुस्ती, विहिरींचे व तलावांचे खोलीकरण, टँकरद्वारे पाणीपुरवठा करणे.

या गावात विहिरी, बोअर अधिग्रहण

अमरावती तालुक्यातील देवरा, कस्तुरा, माेगरा, नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील टाकळी कानडा, नागझरी, परसमंडळ, भातकुली तालुक्यातील दाढी-पेढी, चिखलदरा तालुक्यातील आकी, हतरू सरपंच ढाणा, तिवसा तालुक्यातील शिदवाडी अशा चार तालुक्यांमधील दहा गावांतील नागरिकांची विहीर व बोअर अधिग्रहण करून तहान भागविली जात आहे.

यंदाच्या पाणीटंचाई निवारणार्थ टंचाई आराखड्यानुसार कामांचे नियोजन केले जात आहे. टंचाईवर मात करण्यासाठी आवश्यक तसेच प्रस्तावित सर्व उपाययोजना करण्याचा पाणीपुरवठा विभागाचा प्रयत्न आहे.

- संदीप देशमुख, कार्यकारी अभियंता, ग्रामीण पाणीपुरवठा विभाग

Web Title: Tanker at one place, acquisition of wells in 10 villages, water shortage in Melghat since March this year

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.