टँकर मंजुरीचे अधिकार आता उपविभागीय अधिकाऱ्यांना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2021 04:12 AM2021-04-16T04:12:47+5:302021-04-16T04:12:47+5:30
अमरावती : उन्हाळी पाणीटंचाईच्या काळात पिण्याच्या पाण्याची टंचाई लक्षात घेता पिण्याच्या पाण्याचे टँकर मंजूर करण्याचे अधिकार राज्य ...
अमरावती : उन्हाळी पाणीटंचाईच्या काळात पिण्याच्या पाण्याची टंचाई लक्षात घेता पिण्याच्या पाण्याचे टँकर मंजूर करण्याचे अधिकार राज्य शासनाने आतापर्यंत संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना प्रदान केले होते. मात्र, राज्यातील कोरोना संसर्गाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन आता टंचाईग्रस्त गाव आणि वाड्यांना पिण्याच्या पाण्याचे टँकर मंजुरीचे अधिकार शासनाने संबंधित उपविभागीय अधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी यांना प्रदान केले आहेत.
सन २०२०-२१ उन्हाळी पाणीटंचाई कालावधीसाठी ३० जून २०२१ पर्यंत हे अधिकार एचडीओंना प्रदान करण्यात आले आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेकडून पिण्याच्या पाण्याचा पुरेसा पुरवठा होऊ शकत नसल्यास टँकरव्दारे पिण्याच्या साधारण वापराकरिता पाणी उपलब्ध करून देणे आवश्यक असते. तसेच टंचाई परिस्थिती विचारात घेता पिण्याच्या पाण्याचे टँकर मंजूर करणे आवश्यक असते. मात्र, जिल्हा प्रशासन सद्यस्थितीत कोरोनासाठीच्या नियंत्रणात्मक कामकाजात व्यस्त असल्याने टँकर मंजुरीच्या प्रक्रियेत होऊ शकणारा संभाव्य विलंब टाळण्याकरिता हे अधिकार संबंधित उपविभागीय अधिकारी यांना प्रदान करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.
बॉक्स
उपाययोजना पूर्ण करण्याच्या कालावधीत वाढ
कोरोना विषाणू संसर्गाच्या अनुषंगाने पिण्याच्या पाण्याची टंचाई निवारणाच्या उपाययोजना पूर्ण करण्याच्या कालावधीतही शासनाने आता शिथिलता दिली आहे. तात्पुरत्या नळ पाणीपुरवठा योजना व नळ योजना वा विंधन विहिरीच्या विशेष दुरुस्तीची कामे टंचाई निवारणाच्या उपाययोजनांतर्गत दरवर्षी करण्यात येतात. या टंचाई निवारणाच्या कामांकरिता ३० एप्रिलपर्यंत विविध आर्थिक व भौतिक निकषानुसार मान्यता देण्यास शासनाने मंजुरी देण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, आता ३१ मे पर्यंत पूर्ण करणे शक्य होणार असल्याने ती कामे टंचाई कालावधीत उपयोगात आणता येतील.
बॉक्स
चार गावांत टँकरने पाणीपुरवठा
उन्हाळा सुरू होताच जिल्ह्यात पाणीटंचाईने डोकेवर काढले आहे. आजघडीला मेळघाटातील चिखलदरा या तालुक्यात एकझिरा, लवादा, आकी या तीन गावांसह चांदूर रेल्वे तालुक्यातील सावंगी मग्रापूर अशा चार गावांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यासाठी चार टँकर सुरू असल्याची माहिती झेडपी पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता राजेंद्र सावळकर यांनी ‘लाेकमतशी बोलताना दिली.