टँकर उलटला, २५ हजार लीटर आॅईल रस्त्यावर
By admin | Published: June 22, 2017 12:08 AM2017-06-22T00:08:03+5:302017-06-22T00:08:03+5:30
स्टेअरिंगवरील नियंत्रण सुटल्याने ईल्ड आॅईल घेऊन जाणारा भरधाव टँकर उलटल्याची घटना बुधवारी सकाळी ६ वाजता नागपूर राज्य मार्गावर गौरी ईन हॉटेलजवळ घडली.
नागपूर मार्गावरील घटना : नागरिकांची गर्दी
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : स्टेअरिंगवरील नियंत्रण सुटल्याने ईल्ड आॅईल घेऊन जाणारा भरधाव टँकर उलटल्याची घटना बुधवारी सकाळी ६ वाजता नागपूर राज्य मार्गावर गौरी ईन हॉटेलजवळ घडली. या अपघातात चालक आसिफ अली मोहम्मद शेख (३२) व वाहक अतऊला नबी हुसेन (२५,दोन्ही राहणार वडाळा, मुंबई) हे दोघे जखमी झालेत. त्यांना उपचारासाठी जिल्हा सामान्य रूग्णालयात दाखल करण्यात आले.
पोलीस सूत्रानुसार गुजरातच्या बडोदा शहरातून ईल्ड आईल घेऊन एम.एच.४९ ए.आर.-१८९१ क्रमांकाचा टँकर नागपूर येथील खापर्डीकडे जात होता. बुधवारी सकाळी ६ वाजता टँकर चालकाचे स्टेअरिंगवरील नियंत्रण सुटले आणि भरधाव टँकर उलटला.
चालक किरकोळ जखमी
अमरावती : या अपघातात चालक व वाहक किरकोळ जखमी झाले. घटनेची माहिती मिळताच गाडगेनगर पोलीस ठाण्याचे पीएसआय बळीराम राठोड यांच्यासह पोलीस पथकाने घटनास्थळ गाठले. त्यावेळी टँकरमधील आॅईलची मोठ्या प्रमाणात गळती सुरु होती. या टँकरमध्ये २५ हजार लीटर ईल्ड आॅईल होते. टँकर उलटल्याने ते आॅईल रस्त्यावर पसरले. पोलिसांनी टँकर सरळ करण्यासाठी क्रेनची मदत घेतली. क्रेनच्या सहाय्याने टँकर सरळ करण्यात आले. गाडगेनगर पोलिसांनी पुढील चौकशी सुरु केली आहे.
आॅईल गोळा करण्यासाठी झुंबड
टँकर अपघातग्रस्त झाल्यानंतर त्यातील आॅईलचे लोट रस्त्यावरून वाहू लागले. ही बाब कर्णोपकर्णी होताच आसपासच्या नागरिकांनी डबक्या, बाटल्या घेऊन घटनास्थळी गर्दी करून रस्त्यावरून वाहून जाणारे मिळेल तेवढे आॅईल गोळा केले. अपघातानंतर बराच वेळ नागरिकांची आॅईल गोळा करण्यासाठी झुंबड उडाली होती.