तीन ग्रामपंचायतींना तंटामुक्तीचा पुरस्कार
By admin | Published: November 20, 2014 10:44 PM2014-11-20T22:44:49+5:302014-11-20T22:44:49+5:30
शासनाच्या महात्मा गांधी तंटामुक्त गाव अभियानांतर्गत दर्यापूर तालुक्यातील लेहेगाव, कळाशी, आमला या ग्रामपंचायतीला तंटामुक्त पुरस्कार नुकताच बहाल करण्यात आला.
दर्यापूर : शासनाच्या महात्मा गांधी तंटामुक्त गाव अभियानांतर्गत दर्यापूर तालुक्यातील लेहेगाव, कळाशी, आमला या ग्रामपंचायतीला तंटामुक्त पुरस्कार नुकताच बहाल करण्यात आला.
गावातील तंटे गावातच मिटवून आदर्श गाव करण्याचा उद्देश असलेल्या या योजनेंतर्गत लेहेगावला ३ लक्ष रुपयांचा तर कळाशीला ३ लक्ष रुपये व आमल्याला २ लक्ष रुपयांचा पुरस्कार मिळाला. बुधवारी दर्यापूर पोलीस ठाण्यात पार पडलेल्या छोटेखानी कार्यक्रमात उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल गायकवाड, ठाणेदार जे.के. पवार यांचे हस्ते पुरस्कार प्राप्त गावांतील सरपंच, सचिव, तंटामुक्तीचे अध्यक्ष, पोलीस पाटील यांना धनादेशाचे वितरण करण्यात आले. या परिसरातील सर्व गावे आदर्श होतील व पुढील वर्षी पुरस्कारासाठी अनेक गावांचा यामध्ये समावेश असेल, असा विश्वास दर्यापूरचे उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल गायकवाड यांनी व्यक्त केला. यावेळी कळाशीचे सरपंच बेबीताई पवार, सचिव पी.एस. ढोक, तंटामुक्त अध्यक्ष पुंडलिक देवतळे, अशोकराव कुटेमाटे, भरत राणे, सदस्य रामनाथ पवार आदी तर आमला ग्रामपंचायतीचे सरपंच अन्वर शहा, सचिव आर. व्ही. सराड, तंटामुक्तीचे अध्यक्ष पवनराजे वानखडे, पोलीस पाटील श्रीकृष्ण बुंदेले, लेहगावच्या सरपंच रेखा महानकर, सचिव व्ही.जी. शिंदे, भीमराव डोंगरदिवे, मात्रे, दिनेश इंगोले उपस्थित होते. (प्रतिनिधी)