नळाला लागतात ‘टिल्लू’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2018 11:39 PM2018-04-10T23:39:16+5:302018-04-10T23:39:16+5:30
वैभव बाबरेकर ।
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या नळालाच मशीन लावून पाणी ओढले जात असल्यामुळे प्रामाणिक ग्राहकांना पुरेशा प्रमाणात पाणी मिळविण्यासाठी कसरत करावी लागत आहे. मशीन लावून पाणी खेचणाऱ्या ग्राहकांवर कारवाई करण्याची जबाबदारी मजीप्रा प्रशासनाची असताना, या विषयातही अधिकारी वर्ग हतबल असल्याचे दिसून येत आहे.
सिंभोरा धरणावरून अमरावतीकरांना पाणीपुरवठा होतो, मासोद येथील जलशुद्धीकरण केंद्राहून ग्राहकांच्या घरापर्यंत शुद्ध पाणीपुरवठा केला जातो. यादरम्यान पाइप लाइनमधून होणारी गळती व पाणीचोरीमुळे लाखो लिटर पाण्याचा अपव्यय होतो. मजीप्रा ९० हजारांवर ग्राहकांना पाणीपुरवठा करते. यापैकी ५० टक्क्यांवर ग्राहक मशीनद्वारे पाणी खेचत असल्याचे निदर्शनास आले. त्यातच आता उन्हाळाचे दिवस आहे. एक दिवसाआड अर्थात ७२ तासानंतर तास-दोन तास पाणीपुरवठा केला जातो. त्यातच टिल्लू पंप लावून नळाचे पाणी खेचले जात असल्यामुळे पाण्याची चणचण अधिकच वाढली आहे. मशीनने पाणी खेचणाऱ्यांच्या घरी मोठी धार, तर प्रामाणिकपणे पाणी भरणाºयांच्या घरी बारीक धारेने पाणीपुरवठा होत राहतो.
पोलिसांची मदत घेणार
मशीनद्वारे पाणी खेचणाऱ्यांविरुद्ध कारवाई करण्यासाठी मजीप्रा अधिकाऱ्यांनी अद्यापपर्यंत कोणत्याही प्रकारचे ठोस पाऊले उचलली नाही. एक ते दोन घराआड नळाला थेट मशीन लावून पाणी खेचले जात आहे. ही वस्तुस्थिती माहिती असतानाही मजीप्रा ठोस उचलत नाही. हा एकप्रकारे प्रामाणिक ग्राहकांवर अन्यायच आहे. शुद्ध पाण्याचा पुरवठा करणारी मजीप्रा मशीन लावणाऱ्या ग्राहकांपासून त्रस्त झाली आहे. आधीच मजीप्राकडे मनुष्यबळाचा अभाव आहे. घरोघरी मशीन असल्यामुळे कर्मचारी कुठे-कुठे पाठविणार, अशी स्थिती मजीप्राची झाली आहे. कारवाई करण्यासाठी गेलेल्या मजीप्रा अधिकारी व कर्मचाऱ्यांवर नागरिक रोष व्यक्त करतात. त्यामुळे आता मजीप्रा पोलीस मदत घेऊन मशीन लावणाऱ्या ग्राहकांवर कारवाईचा बडगा उगारणार आहे.
सदनिकांमध्ये सर्वाधिक प्रकार
शहर विकासाच्या दिशेने वाटचाल करीत असताना, फ्लॅटमध्ये राहणे दिवसेंदिवस पसंत केले जात आहे. त्यामुळे शहरातील कानाकोपºयात आता फ्लॅट बनले आहेत. या ठिकाणीही मजीप्राद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. मात्र, फ्लॅटमध्ये राहणारे रहिवासी पाणी वर चढत नसल्याने थेट मजीप्राच्या नळालाच इलेक्ट्रिक मशीन लावून पाणी खेचण्याचा प्रकार सर्रास करतात. त्यामुळे खालच्या भागात राहणाºयांना योग्य व पुरेसा पाणीपुरवठा होत नाही.
मजीप्रा करते हवेचेही बिल वसूल!
एक दिवसाआड पाणीपुरवठा व टिल्लू मशीनद्वारे पाणी खेचले जात असल्यामुळे ग्राहकांना सुरळीत पाणी मिळत नाही. त्यातच पाणीपुरवठा सुरू होण्यापूर्वी १० ते १५ मिनिटे हवा पास होत राहते. त्यावेळी मीटरचे रीडिंग सुरूच असते. गेल्या कित्येक वर्षांपासून हा प्रकार सुरू आहे.
पाणीपुरवठा करणाऱ्या नळांना मशीन लावून पाणी खेचले जात असल्यामुळे पाणी पुरवठा नियोजन बिघडले आहे. फ्लॅट सिस्टीममध्ये तर हे प्रकार अधिकच वाढले आहेत. याविषयी वरिष्ठांशी चर्चा करून कारवाईची दिशा ठरविण्यात येईल.
- किशोर रघुवंशी, उपविभागीय अभियंता