आरटीई प्रवेशाच्या शाळा रजिस्ट्रेशन शंभर टक्के नोंदणीचे टार्गेट; प्राथमिक शिक्षण संचालनालयाचे आदेश
By जितेंद्र दखने | Published: March 8, 2024 08:11 PM2024-03-08T20:11:54+5:302024-03-08T20:12:40+5:30
दरवर्षीप्रमाणे शैक्षणिक सत्र २०२४-२५ या वर्षात आरटीई २५ टक्के प्रवेश प्रक्रिया ऑनलाइन राबविण्यात येणार आहे.
अमरावती: बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ नुसार स्थानिक स्वराज्य संस्थांसह खासगी अनुदानित, स्वयंमअर्थसहाय्यित, विनाअनुदानित शाळांमध्ये प्रवेश स्तरावर २५ टक्के जागा वंचित व दुर्बल घटकातील मुलामुलींसाठी राखीव ठेवण्याची तरतूद आहे. त्या अनुषंगाने आरटीई प्रवेशाकरिता वरील शाळांचे १०० टक्के नोंदणीचे टार्गेट प्राथमिक शिक्षण संचालनालयाने दिले आहे. याकरिता ६ ते १८ मार्चपर्यंत मुदत देण्यात आली आहे. या मुदतीत आरटीई अंतर्गत पात्र शाळांचे रजिस्ट्रेशन पूर्ण न केल्यास याची शिक्षणाधिकारी प्राथमिक व प्रशासन अधिकारी यांच्या जबाबदारी निश्चित केली जाणार असल्याचे शिक्षण संचालकांनी या आदेशात स्पष्ट केले आहे.
दरवर्षीप्रमाणे शैक्षणिक सत्र २०२४-२५ या वर्षात आरटीई २५ टक्के प्रवेश प्रक्रिया ऑनलाइन राबविण्यात येणार आहे. त्यानुसार जिल्ह्यातील २५ टक्के प्रवेश प्रक्रिया लागू असलेल्या सर्व पात्र शाळांची ऑनलाइन नोंदणी येत्या १८ मार्च पर्यंत करणे आवश्यक आहे. बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क कायद्यांतर्गत आता यापुढे विद्यार्थ्यांना त्यांच्या घरापासून एक किमी अंतरावरील शासकीय किंवा अनुदानित शाळांमध्ये प्रवेश दिला जाणार आहे. या पार्श्वभूमीवर प्राथमिक शिक्षण संचालनालयाने पहिल्यांदा शाळांचे रजिस्ट्रेशन करून सर्व शाळांचे मॅपिंग केले जाणार आहे. प्राथमिक शिक्षण संचालनालयाच्या आदेशानुसार जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाने जिल्हाभरात ६ मार्चपासून आरटीई प्रवेश प्रक्रिया लागू असलेल्या शाळांचे ऑनलाइन रजिस्ट्रेशनची प्रक्रिया सुरू केली आहे.
जिल्ह्यात आरटीई अंतर्गत २५ टक्के प्रवेश प्रक्रिया लागू असलेल्या सर्व शाळांना ऑनलाइन रजिस्ट्रेशन करण्यासाठी शिक्षण विभागामार्फत सूचना दिलेल्या आहेत. प्राथमिक शिक्षण संचालनालयाच्या आदेशानुसार शाळा ऑनलाइन रजिस्ट्रेशनची प्रक्रिया सुरू केलेली आहे. - बुद्धभूषण सोनोने, शिक्षणाधिकारी (प्राथमिक), जिल्हा परिषद, अमरावती