जैन मुनी तरुण सागरजी महाराज यांची मुक्तागिरी भेट राहून गेली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 1, 2018 08:15 PM2018-09-01T20:15:41+5:302018-09-01T20:18:38+5:30

जैन मुनी तरुण सागरजी महाराज यांचे  जैनधर्मीयांचे सिद्धक्षेत्र असलेल्या मुक्तागिरी तथा दक्षिण भारताचे शिखरजी मेंढेगिरी येथे येण्याचे त्यांचे स्वप्न अपूर्ण राहिले. त्याबद्दल येथील जैन बांधवांसह संस्थानच्या व्यवस्थापकांनी त्यांच्या स्मृतीला उजाळा दिला.

Tarun Sagarji Maharaj's wish to visit Muktagiri is remain unfulfilled | जैन मुनी तरुण सागरजी महाराज यांची मुक्तागिरी भेट राहून गेली

जैन मुनी तरुण सागरजी महाराज यांची मुक्तागिरी भेट राहून गेली

Next
ठळक मुद्देनागपूरच्या चतुर्मासात पोहोचायला झाला असता विलंब जैनांची काशी आहे मुक्तागिरी

नरेंद्र जावरे
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : जैन मुनी तरुण सागरजी महाराज यांचे  जैनधर्मीयांचे सिद्धक्षेत्र असलेल्या मुक्तागिरी तथा दक्षिण भारताचे शिखरजी मेंढेगिरी येथे येण्याचे त्यांचे स्वप्न अपूर्ण राहिले. त्याबद्दल येथील जैन बांधवांसह संस्थानच्या व्यवस्थापकांनी त्यांच्या स्मृतीला उजाळा दिला.
‘जैन धर्मीयांची काशी’ म्हणून ओळख असलेल्या मुक्तागिरी येथे सर्व जैन मुनी संत भेट देतात. देश-विदेशातून येथे मोठ्या प्रमाणात जैन बांधव वर्षभर दर्शनासाठी येतात. प्रत्येक आठवड्यातील रविवार वगळता प्रवेश सुरू राहतो. येथे पुरातन ५२ मंदिरे आहेत.

पाच वर्षांपूर्वी आला होता योग
जैन मुनी तरुण सागरजी महाराज मुक्तागिरी येथे यावेत, यासाठी संस्थानचे ट्रस्टी अशोक चवरे यांनी कारंजा येथील त्यांच्या निवासस्थानी जैन मुनी आले असता, इच्छा प्रकट केली होती. त्यावर वेळेचा अवधी पाहता, नागपूर येथील चतुर्मास कार्यक्रमानिमित्त हे शक्य नसल्याने तरुण सागरजी महाराज यांची मुक्तागिरी येथील भेट हुकली. बंगळुरू येथून पुणे, अकलूज, पंढरपूर, औरंगाबाद, कारंजामार्गे नागपूरला जात असताना अशोक चवरे यांच्या घरी मुनी तरुण सागरजी यांनी विहार केला होता. त्यावेळी जैनांच्या काशीत येण्याची इच्छा प्रकट केली असल्याचे मुक्तागिरी संस्थानचे प्रबंधक नेमिचंद महाजन (जैन) यांनी सांगितले.

मुक्तागिरीला मुनींनी दिल्या भेटी
जैन धर्मीयांची काशी असलेल्या मुक्तागिरी येथे पुरातन काळापासून जैन मुनींनी भेटी दिल्या आहेत. विद्यासागरजी महाराजांनी १९८०, १९९० आणि २०११ अशी तीन वर्षे भेट देऊन चतुर्मास केला. येथे दिगंबर दीक्षासुद्धा नऊ जणांना देण्यात आली. बाहुबलीजी महाराज, भद्रबाहूजी महाराज, तेजभूषणजी महाराज आदी जवळपास सर्वच जैन मुनींनी मुक्तागिरीला भेटी दिली आहे.

जैनांची काशी आहे मुक्तागिरी
जैन धर्मीयांचे सिद्ध क्षेत्र मुक्तागिरी तथा दक्षिण भारताचे शिखरजी मेंढेगिरी महाराष्ट्र-मध्य प्रदेशच्या सीमेवर वसले असून, सातपुडा पर्वतरांगांमध्ये असलेल्या मुक्तागिरीला जैन धर्मियांची पुरातन ५२ मंदिरे आहेत. सर्व मंदिर वेगवेगळ्या शतकांतील असून, काही पंधराव्या तर काही सोळाव्या शतकातील अतिप्राचीन मंदिरे ४०० फूट उंच पर्वतावर आहेत. एक हजार वर्षांपूर्वीची भगवान पार्श्वनाथाची मूर्ती या ठिकाणी आहे. शिल्पकलेचे उत्कृष्ट उदाहरण म्हणजे मुक्तागिरीचा उल्लेख होतो. अष्टमी, पौर्णिमेला केशर, चंदनाचा वर्षाव येथे होतो. दिवाळीनंतर येणाऱ्या पहिल्या पौर्णिमेला या ठिकाणी यात्रा भरते.

जैन मुनी तरुण सागरजी महाराज मुक्तागिरीला पाच वर्षांपूर्वी येणार होते. मात्र, नागपूर येथे चतुर्मास कार्यक्रमाला पोहोचण्यास कालावधी अपूर्ण पडत असल्यामुळे कारंजाहून थेट नागपूरला गेले. येथे येण्याची त्यांची इच्छा अपूर्ण राहिली.
नेमिचंद महाजन (जैन)
प्रबंधक, मुक्तागिरी संस्थान

Web Title: Tarun Sagarji Maharaj's wish to visit Muktagiri is remain unfulfilled

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.