समाजशास्त्र विभागाच्या तासिका प्राध्यापिकेचा मुद्रांक पळविला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2021 04:12 AM2021-07-30T04:12:53+5:302021-07-30T04:12:53+5:30
अमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या समाजशास्त्र विभागाच्या तासिका प्राध्यापिकेचा मुद्रांक आजीवन अध्ययन व विस्तार विभागाने पळविला, ही बाब ...
अमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या समाजशास्त्र विभागाच्या तासिका प्राध्यापिकेचा मुद्रांक आजीवन अध्ययन व विस्तार विभागाने पळविला, ही बाब माहिती अधिकारातून स्पष्ट झाली आहे. त्यामुळे समाजशास्त्र विभागप्रमुख के.बी. नायक यांचे नियंत्रण नसल्याची बाब आता स्पष्ट झाली आहे.
विद्यापीठाचे आजीवन अध्ययन व विस्तार विभागप्रमुख श्रीकांत पाटील हे आहेत. सन २०१९-२०२० मध्ये तासिका प्राध्यापक रोहिणी देशमुख यांनी १०० रुपयांच्या मुद्रांकावर सादर केलेल्या शपथपत्राची छायांकित प्रत व वेगवेगळ्या मुद्द्यांसह तासिकांची माहिती मागविली होती. त्याअनुषंगाने ९ जुलै २०२१ रोजीच्या पत्रानुसार समाजशास्त्र विभागप्रमुख के. बी. नायक यांच्याकडे रोहिणी देशमुख यांनी सादर केलेल्या १०० रुपयांच्या मुद्रांकावर शपथपत्राची प्रत दिली. मात्र, हा मुंद्राक आजीवन विस्तार विभागात पोहोचला कसा, हा संशोधनाचा विषय आहे. रोहिणी देशमुख यांना विद्यापीठात नऊ तासिकांचा कार्यभार असून, विद्यापीठाशिवाय इतर कोणत्याही महाविद्यालयात कार्यरत नाही, असे नमूद केले आहे. मात्र, रोहिणी देशमुख यांना समाजशास्त्र विभागात सहा तासिका, आजीवन अध्ययन विभागात तीन तासिका आणि शिवाजी कला व वाणिज्य महाविद्यालयाच्या मुक्त विद्यापीठ केंद्रात १८ तासिका आहेत, ही बाब माहिती अधिकारातून स्पष्ट झाली आहे. एकाच वेळी तासिका तत्त्वावरील प्राध्यापकांना भरमसाठ तासिका उपलब्ध करून देणे हे नियमबाह्य आहे. अनेक पात्रताधारक बेरोजगारांना तासिका मिळत नाही, तर दुसरीकडे मर्जीतील काही प्राध्यापकांना तासिकांची खैरात वाटप करणे असा प्रकार समाजशास्त्र विभागात सुरू आहे. या प्रकाराला विभागप्रमुख जबाबदार असल्याचा आरोप सुधीर नागापुरे यांनी केला आहे.
--------------
कोट
रोहिणी देशमुख यांनी समाजशास्त्र विभागात सहा, तर आजीवन विस्तार विभागात नऊ तासिका मिळत असल्याचे १०० रुपयांचा मुद्रांकावर लिहून दिले आहे. यात काहीही नियमबाह्य नाही.
- श्रीकांत पाटील, विभागप्रमुख, आजीवन व अध्ययन विस्तार