विशाखा समितीच्या अंमलबजावणीसाठी आता टास्क फोर्स
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 1, 2021 04:14 AM2021-04-01T04:14:14+5:302021-04-01T04:14:14+5:30
अमरावती : राज्यातील सर्व नोंदणीकृत आस्थापना, कारखाने, कंपनी, संघटित असंघटित क्षेत्रात कामाच्या ठिकाणी महिलांचे लैंगिक छळ केल्याच्या घटना घडतात. ...
अमरावती : राज्यातील सर्व नोंदणीकृत आस्थापना, कारखाने, कंपनी, संघटित असंघटित क्षेत्रात कामाच्या ठिकाणी महिलांचे लैंगिक छळ केल्याच्या घटना घडतात. यापासून संरक्षणासाठी आलेल्या तक्रारींची वेळीच दखल घेणे गरजेचे आहे. सर्व विभागांनी नियमानुसार उचित कारवाईचे निर्देश महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी संबंधित अधिकाऱ्यांच्या आयोजित बैठकीत बुधवारी दिले. आता विशाखा समितीच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी टास्क फोर्स नेमणार असल्याचे त्यांनी सांगितले.
तक्रारींची चौकीशी करण्यासाठी सर्व जिल्हा महिला व बालविकास अधिकारी यांना याबाबतच्या सूचना देण्यात आलेल्या आहे. सर्व जिल्ह्यांमध्ये स्थानिक स्तरावर तक्रार समिती गठित करण्यात आली आहे. प्रत्येक जिल्ह्यांचे उपजिल्हाधिकारी यांनी या नियोजनासाठी एक समन्वय अधिकारी निवडावा व त्यांच्या कार्यक्षेत्रातील लैंगिक छळाच्या तक्रारी प्राप्त करून संबंधित स्थानिक तक्रार समितीकडे पाठवाव्यात. असे ना. ठाकूर यांनी सांगितले. याबाबतचा अहवाल संबंधित जिल्हाधिकारी यांना सादर करून त्यांनी तो अहवाल महिला व बालविकास विभागाला प्रत्येक वर्षाच्या ३० एप्रिलपूर्वी सादर करावा, अशी तरतूद नियमानुसार असून याबाबतची सर्व कार्यवाही नियमानुसार करावी, असे निर्देशही ना. ठाकूर यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले. कामाच्या ठिकाणी महिलांची छळवणूक, अत्याचार रोखण्यासाठी असलेल्या विशाखा समितीच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी बुधवारी बैठक झाली. यावेळी प्रधान सचिव आय.ए. कुंदन, कामगार विभागाच्या सचिव विनिता वेद तसेच सामान्य प्रशासन, उद्योग, ऊर्जा, सहकार विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
बॉक्स
विशाखा समिती नेमणे अनिवार्य
कामाच्या ठिकाणी महिलांचे लैंगिक छळापासून संरक्षण (प्रतिबंध, मनाई व निवारण) अधिनियम २०१३ अंतर्गत विशाखा समिती नेमणे अनिवार्य आहे. शासकीय तसेच खासगी कार्यालयात विशाखा समितीच्या माध्यमातून महिलांना न्याय मिळावा यासाठी कठोर पावले उचलावी, तसेच अमंलबजावणीकरिता टास्क फोर्स स्थापन करण्यात यावा असे निर्देश यावेळी ना. यशोमती ठाकूर यांनी दिले.