एमआर तरूणासोबत ‘टास्क फ्रॉड’, ८१ हजारांनी गंडा
By प्रदीप भाकरे | Published: October 1, 2023 02:22 PM2023-10-01T14:22:48+5:302023-10-01T14:23:57+5:30
ऑनलाईन टास्क पूर्ण करण्याच्या नादात येथील एका एमआर (मेडिकल रिप्रेझेंटिटिव्ह) ला ८१ हजार रुपयांनी गंडा घालण्यात आला.
अमरावती: ऑनलाईन टास्क पूर्ण करण्याच्या नादात येथील एका एमआर (मेडिकल रिप्रेझेंटिटिव्ह) ला ८१ हजार रुपयांनी गंडा घालण्यात आला. २७ ते २९ सप्टेंबरदरम्यान ती ठकबाजी झाली. याप्रकरणी अक्षय रूपराव दामोधर (२७, कठोरा रोड) याच्या तक्रारीवरून गाडगेनगर पोलिसांनी ३० सप्टेंबर रोजी रात्री एका अज्ञात इन्स्टाग्राम अकाउंटधारकाविरुद्ध फसवणूक व आयटी ॲक्टअन्वये गुन्हा दाखल केला.
अक्षयला २७ सप्टेंबर रोजी दुपारी १२.३० च्या सुमारास तुम्ही घरी बसून ५ ते ६ हजार कमवू शकता, असा एक मेसेज आला. त्या इन्स्टाग्रामधारकाने त्याला लगेच एक आयडी दिली. ती आयडी एका ग्रुपशी संलग्न करण्यात आली. त्यानंतर त्याला वेगवेगळे टास्क देण्यात आले. ते पूर्ण करताच अक्षयच्या खात्यात रक्कम जमा होत गेली. आरोपींनी नवीन नवीन आयडी बनवून अक्षयचे मन जिंकले. त्यानंतर आरोपीने स्विटकेट डॉट कॉम या आयडीवर अक्षयला २५ हजार ८०० रुपये टाकायला लावले. ती रक्कम टाकल्यानंतर त्याने पुन्हा ५५ हजार ३०० रुपये टाकले. त्यावेळी आरोपींनी त्याला तुम्ही पुन्हा टास्क हरलात, असे सांगितले.
त्यावर त्याने पैसे परत करण्याची मागणी करताच आरोपींनी ती आयडी बंद केली. आरोपींनी आपल्याला घरी बसून पैसे कमवा असे जॉबचे आमिष दाखवून इन्स्टाग्रामच्या माध्यामातून आपली फसवणूक केल्याचे लक्षात आल्यानंतर त्याने पोलीस ठाणे गाठले.