अमरावतीमध्ये रेल्वेला टाटा सुमो धडकून भीषण अपघात, सात प्रवासी जखमी
By ऑनलाइन लोकमत | Published: April 24, 2019 07:23 PM2019-04-24T19:23:06+5:302019-04-24T19:26:41+5:30
संथगतीने धावण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या शकुंतला रेल्वे गाडीला गायवाडी ते कळाशी दरम्यान टाटा सुमो धडकली. या अपघातात सात प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत.
अमरावती - संथगतीने धावण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या शकुंतला रेल्वे गाडीला गायवाडी ते कळाशी दरम्यान टाटा सुमो धडकली. या अपघातात सात प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत.
मूर्तिजापूर ते अचलपूर अशी फेरी करणारी इंग्रजकालीन डब्यांची शकुंतला रेल्वे गाडी बुधवारी दुपारी ४ च्या सुमारास परतीच्या प्रवासात दर्यापूरहून मूर्तिजापूरकडे धावत होती. गायवाडी येथील गेटसमोर अचानक एमएच ३० पी १३०२ क्रमांकाची टाटा सुमो रेल्वे गाडी आली. शकुंतलेने या वाहनाला तब्बल पाचशे मीटर ढकलत नेले. यानंतर ही रेल्वे गाडी थांबली.
दर्यापूर तालुक्यातील येवदा येथून लग्न समारंभातून टाटा सुमोतील वºहाडी मंडळी कळाशीकडे येत होती. गायवाडी रोडवरील रेल्वे क्रॉसिंगजवळ शकुंतलेच्या चालकांनी हॉर्न देऊनसुद्धा टाटा सुमोचालकाचे लक्ष नव्हते. त्यामुळे बसलेल्या धडकेत वाहनातील गोपाळराव देवतळे, ज्ञानेश्वरराव बरवट, राजू रामकृष्ण राणे, चंद्रशेखर गावंडे, राजू श्रीरंग राणे, चालक संतोष साबळे व समर्थ विकास राणे (सर्व रा. कळाशी) हे सात प्रवासी गंभीर जखमी झाले. त्यांना दर्यापूर येथे उपजिल्हा रुग्णालयात उपचाराकरिता दाखल करण्यात आले. गंभीर जखमींना अमरावती येथे जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले. साडेचार वाजता शकुंतला रेल्वे मूर्तिजापूरकडे रवाना झाली. सदर घटनेचा पुढील तपास दर्यापूर पोलीस करीत आहेत.