Amravati: तू शर्मा रही है क्या’ म्हणत मुलींची छेड, धावत्या वाहनात विनयभंग, पीडितांच्या मित्राला मारहाण
By प्रदीप भाकरे | Published: August 27, 2023 01:32 PM2023-08-27T13:32:32+5:302023-08-27T13:32:57+5:30
-प्रदीप भाकरे अमरावती : ‘‘तू शर्मा रही है क्या’ म्हणत एका मुलीसह तिच्या मैत्रिणीची छेड काढण्यात आली. तथा तिच्या ...
-प्रदीप भाकरे
अमरावती: ‘‘तू शर्मा रही है क्या’ म्हणत एका मुलीसह तिच्या मैत्रिणीची छेड काढण्यात आली. तथा तिच्या मित्राला मारहाण करण्यात आली. २५ ऑगस्ट रोजी सायंकाळी ६.३० च्या सुमारास डोमा ते काटकुंभ प्रवासादरम्यान ती घटना घडली. याप्रकरणी १६ वर्षीय मुलीच्या तक्रारीवरून चिखलदरा पोलिसांनी २६ ऑगस्ट रोजी पहाटे ३.१९ च्या सुमारास आरोपी मुरली बछले (२४, रा. डोमा) याच्याविरूध्द विनयभंग, मारहाण, धमकी व शिविगाळ केल्याचा गुन्हा दाखल केला.
तक्रारीनुसार, फिर्यादी १६ वर्षीय मुलगी व तिचे मित्र मैत्रिणी खासगी वाहनाने जात असताना काटकुंभ ते डोमाच्या मध्यात आरोपीने त्या १६ वर्षीय मुलीस ‘तू शर्मा रही है क्या’ असे म्हणत तिच्याकडे वाईट नजरेने पाहिले. तर तिच्या मैत्रिणीला ‘तू बहोत अच्छी दिखती है, मै तुझसे प्यार करता हू, असे म्हणून तिचा देखील विनयभंग केला. आरोपी मुरली बछले हा आपल्या मैत्रिणींची छेड काढत असल्याने पिडिताच्या मित्राने त्याला हटकले. त्यावर आरोपीने त्याच्या तोंडावर बुक्की मारून त्याला जखमी केले. त्यामुळे त्या खासगी वाहनात मोठी खळबळ उडाली. सबब, त्या मुलामुलींनी शुक्रवारी रात्रीच्या सुमारास चिखलदरा पोलीस ठाणे गाठले. तथा तक्रार नोंदविली. २६ ऑगस्ट रोजी पहाटे ती तकार नोंदविली गेल्याने त्यांना २५ च्या सायंकाळपासून चिखलदरा पोलीस ठाण्यात थांबावे लागले.
थोराडाकडून अल्पवयीन मुलीचा पाठलाग
एका ४६ वर्षीय थोराडाने कॉलेजपर्यंत आपला पाठलाग चालविला असून, तो २५ ऑगस्ट रोजी आपल्या घरात देखील शिरल्याची तक्रार एका १७ वर्षीय मुलीने चांदूर रेल्वे पोलिसांत नोंदविली आहे. याप्रकरणी पोलिसांनी शनिवारी आरोपी राजेश शिवणकर (४६, रा. पळसखेड) याच्याविरूध्द विनयभंग व पॉक्सोअन्वये गुन्हा दाखल केला. आपण कॉलेजमध्ये असताना तो आपल्यावर लक्ष ठेऊन असतो, त्याने आपल्याला घरात घुसण्याची देखील धमकी दिल्याचे पिडिताने म्हटले आहे.