तिवसा तालुक्यात कांदा अवकाळी पावसाने खराब ?
By admin | Published: May 9, 2016 12:13 AM2016-05-09T00:13:34+5:302016-05-09T00:13:34+5:30
तालुक्यातील कास्तकार आधीच सततची नापिकी व दुबार पेरणीचे संकट या दृष्टचक्रात अडकला असताना अवकाळी पावसाने हाती आलेले कांद्याचे पीक वांध्यात आणले.
तिवसा, गुरुकुंज (मोझरी) : तालुक्यातील कास्तकार आधीच सततची नापिकी व दुबार पेरणीचे संकट या दृष्टचक्रात अडकला असताना अवकाळी पावसाने हाती आलेले कांद्याचे पीक वांध्यात आणले. कांदा पिकाला या निसर्गाच्या लहरीपणाचा पुन्हा एकदा फटका बसला आणि कांदा पिकाला मोठी हानी पोहोचवली आहे. या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या तोंडचा कांदा पळवल्याने शेतकरी पुन्हा विवंचनेत सापडले आहे.
गुरूवारी दुपारच्या सुमारास वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाचा जबर तडाखा अमरावती जिल्हाासह तिवसा तालुक्यातही बसला आणि शेतकऱ्यांचा कांदा पिकाचे नुकसान झाले, आधीच खरीप व रबी हंगाममातील पिकांनी शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले. मात्र, शेतकऱ्यांना आशा होती की, कांदा उत्पादन तरी चांगले होईल, म्हणून शेतकऱ्यांनी कर्जबाजारी होऊन कांदा पिकाची लागवड केली. गुरूवारी आलेल्या पावसाने व वादळी वाऱ्याने कांदा या पिकाला जबर तडाखा बसला. अचानकच आलेल्या या पावसाने शेतकरी आपल्या पिकाचे संरक्षण करू शकले नाही त्यामुळे जबर फटका या कांदा पिकाला बसला. तालुक्यातील हजारो शेतकऱ्यांचा कांदा अध्यापही उघड्यावर कापणी करता शेतातच पडला असून, त्या कांद्यांना सड लागण्यास सुरूवात झाली आहे शेतकऱ्यांना वेळेवर मजूर मिळत नाहीे. त्यामुळे शेतकरी आर्थिक कचाट्यात सापडला असून या पिकांपासूनही मुद्दल निघण्याची हमी नाही, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. येत्या काही दिवसांवर शेतकऱ्यांचा खरीप हंगाम येऊन ठेपला आहे. पेरणीची चिंता बळीराजाला लागली आहे. (तालुका प्रतिनिधी)